Sholay Fame Jagdeep : हिंदी सिनेमाच्या ब्लॅक अँड व्हाइट काळातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता जगदीप यांची कोणती वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. त्यांचा अभिनय इतका प्रभावी होता की, त्यांच्यासाठी खास भूमिका लिहिल्या जात. 1975 मध्ये आलेल्या 'शोले'या सिनेमातील सुरमा भोपाली हे त्यांचं पात्र कोणीही विसरु शकणार नाही.
सुरमा भोपाली एवढे लोकप्रिय कसे झाले?
1975 मध्ये आलेल्या 'शोले' चित्रपटात सुरमा भोपाली हे वेगळेच पात्र प्रेक्षकांसमोर आले. मात्र, विशेष गोष्ट म्हणजे हे पात्र मूळ पटकथेत नव्हतेच. नंतर सलीम-जावेद यांनी थोडासा हास्याचा तडका देण्यासाठी हे पात्र निर्माण केले. आणि जगदीप यांनी जेव्हा हे पात्र साकारले, तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. शोले सिनेमातील त्यांचे हे पात्र सिनेसृष्टीत कायमचे अजरामरही झाले.
'सुरमा भोपाली' बनण्याआधीचा दीर्घ प्रवास
जगदीप हे असे कलाकार होते की जिथे गेले तिथे आपली छाप सोडून गेले. त्यांची संवादफेक, चेहऱ्यावरील हावभाव आणि मिश्कील शैली यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करत. वडिलांच्या निधनानंतर फक्त 6 व्या वर्षी त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांची आई मुंबईतील अनाथाश्रमात पोळ्या बनवून उपजीविका करत होती. आईची ही मेहनत पाहून जगदीप यांनीही लहान वयात काम करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या रस्त्यांवर ते कंघी, साबण आणि खेळणी विकत असत. याच दरम्यान एक व्यक्तीच्या नजरेत ते आले – आणि तो कोणी दुसरा नव्हे तर बी. आर. चोप्रा होते.
त्यावेळी चोप्रा ‘अफसाना’ या चित्रपटासाठी बालकलाकार शोधत होते. सामान विकून फक्त 1-1.5 रुपये मिळत असताना फक्त टाळी वाजवण्यासाठी सेटवर 3 रुपये मिळणार म्हणून त्यांनी चित्रपटात काम केले. आणि तिथून त्यांच्या सिनेक्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली.
छोट्या पण लक्षात राहिलेल्या भूमिका
यानंतर त्यांनी ‘दो बीघा जमीन, मुन्ना, हम पंछी एक डाल के, आर पार’ यांसारख्या चित्रपटांत लहान पण लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या. ‘हम पंछी एक डाल के’मधील भूमिकेसाठी त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून गौरवण्यात आले.
ए.व्ही.एम. प्रॉडक्शनने त्यांना ‘भाभी, बरखा, बिंदिया’ यांसारख्या चित्रपटांत नायक म्हणून सादर केले. या चित्रपटांत त्यांनी साध्या-भोळ्या युवकाच्या भूमिका साकारल्या. ‘भाभी’मधील ‘चल उड जा रे पंछी’ हे गाणे आजही लोकांच्या स्मरणात आहे.
विनोद क्षेत्रातली खरी ओळख
मात्र, जेव्हा त्यांनी शम्मी कपूर यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात विनोदी भूमिका केली, तेव्हा प्रेक्षकांना जाणवले की ते नायकापेक्षा अधिक चांगले विनोदी कलाकार आहेत. त्यानंतर त्यांनी विनोदी कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
1960 आणि 70 च्या दशकात जगदीप हे हास्याचे दुसरे नाव बनले होते. त्यांनी ‘तीन बहुरानियां’, ‘खिलौना’, ‘जीने की राह’, ‘गोरा और काला’, ‘इंसानियत’, ‘चला मुरारी हीरो बनने’ यांसारख्या अनेक चित्रपटांत आपल्या परफेक्ट कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
गंभीर आणि नकारात्मक भूमिकाही
फक्त विनोदच नव्हे, तर त्यांनी 'शिकवा', 'धोबी डॉक्टर', 'मंदिर-मशीद' यांसारख्या चित्रपटांत गंभीर आणि नकारात्मक भूमिका देखील साकारल्या. रामसे ब्रदर्सच्या हॉरर चित्रपटांतील ते आवडते कलाकार होते. ‘पुराना मंदिर’, ‘3D सामरी’ या चित्रपटांतील त्यांचे काम प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. 2017 मध्ये आलेल्या ‘मस्ती नहीं सस्ती’ या त्यांच्या शेवटच्या चित्रपटात जॉनी लीवर, कादर खान, शक्ति कपूर आणि रवि किशन यांच्यासोबत त्यांनी काम केले.
अखेरचा निरोप : 8 जुलै 2020
जगदीप यांचे पूर्ण नाव सैयद इश्तियाक अहमद जाफरी होते. त्यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी मध्य प्रदेशातील दतिया या लहानशा गावात झाला. त्यांचे वडील वकिल होते. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती बिघडली आणि त्यांना अत्यंत लहान वयात काम करावे लागले. 8 जुलै 2020 रोजी त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या घरी 81 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
