मुंबई : बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे हे नाव हिंदी-मराठी इंडस्ट्रीला नवीन नाही. शिल्पाने बिग बॉस 11 चा किताबही जिंकला होता. त्या सीझनवेळी ती खूप चर्चेत आली. आता पुन्हा तिची चर्चा होते आहे, कारण, तिने गॅंग्ज ऑफ फिल्मिस्तान हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आणि असं करण्याला तिने जबाबदार धरलं आहे सुनील ग्रोव्हरला.


सुनील ग्रोव्हर आपल्याला कपील शर्मा शोमधून माहित झाला. त्याची आणि कपिलची चांगली मैत्री होती. त्यानंतर दोघांत भांडण झालं आणि सुनीलने शो सोडला. आता या गॅग्ज ऑफ फिल्मिस्तानमध्ये शिल्पा शिंदे काम करत आहे. याच शोमध्ये सुनील ग्रोव्हरही असणार आहे. हे कळल्यावर तिने हा शो सोडायचा निर्णय घेतला आहे.


एका वेबसाईटला दिलेल्या स्पष्टीकरणात ती म्हणते, 'सुनील ग्रोव्हर एक अनुभवी कलाकार आहेत. पण त्यांनी मला नेहमी ज्युनिअर असल्यासारखी वागणूक दिली. आम्ही दोघांनी एका खासगी कंपनीसाठीचा शो केला होता. त्यावेळी मी त्यांना पहिल्यांदा भेटले. मी त्यांची खूप मोठी फॅन होते. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते आपल्याला योग्य वागणूक देत नाहीयेत. त्यांना फक्त आपल्या शेजारी एक चांगली मुलगी उभी रहावी असं वाटत असतं. तिचा ते त्या शोमधल्या प्रॉपर्टीसारखा वापर करतात.'


शिल्पा शिंदेने हा शो सोडल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. 'फिल्मिस्तान' हा शो घेण्यापूर्वीच सुनील या शोमध्ये नसेल असं निर्मात्यांनी तिला सांगितलं होतं. त्यानंतरच तिने हा शो घेतला होता. पण कालांतराने सुनीलही शोमध्ये असल्याचं निर्मात्यांनी सांगितल्यानंतर मात्र आपण हा शो सोडतोय असं तिने आपल्या निर्मात्यांना सांगितलं.