Shibani Dandekar Scold Kapil Sharma Over Marathi Language: हिंदी सक्तीची (Hindi Language) नसली तरी पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्याचा जीआर महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) काढला. त्यामुळे मागच्या दारानं हिंदी सक्तीची केल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी मोर्चाची हाक दिलेली. पण सरकारनं त्रिभाषा सूत्र राबवण्याचा जीआरच रद्द केला. त्यानंतर ठाकरे बंधूंनी वरळीत विजयी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. ठाकरेंच्या या मेळाव्याला तुफान गर्दी जमली होती. एकंदरीतच संपूर्ण राज्यभरात मराठी भाषेचा (Marathi Language) आग्रह केला जात आहे. यावरुन अनेक वाद-विवादांनाही तोंड फुटलं आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर 'द कपिल शर्मा शो'मधले (The Kapil Sharma Show) काही जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये अगदी बॉलिवूड (Bollywood) गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री कपिल शर्माला मराठी येत नसल्यावरुन त्याची फिरकी घेत आहेत.
मला मराठी येते, तुला मराठी येते का? शिबानीच्या प्रश्नावर कपिल शर्मा निरुत्तर
मराठमोळी अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) नुकतीच 'कपिल शर्मा शो'च्या एका एपिसोडसाठी गेस्ट म्हणून आली होती. त्यावेळी तिनं मराठी न येण्यावरुन थेट कपिल शर्माला त्याच्याच अंदाजात खडसावलं आहे. शिबानी दांडेकर शोमध्ये बोलताना म्हणाली की, "मला या शोमध्ये का बोलावलंय? मला हिंदी येत नाही..." मग पुढे ती म्हणते की, "मला मराठी येते, तुला मराठी येते का?" शिबानीचा अचानक आलेला प्रश्न ऐकून कपिल निरुत्तर होऊन शांतपणे पाहत राहतो...
तेवढ्यात पुन्हा शिबानी म्हणते की, इंग्लीश बोलते मी, मराठी बोलते आणि तू हिंदी बोलतोय... आता काय करायचं? शिबानीच्या प्रश्नावर कपिल पुन्हा निरुत्तर होतो आणि शांतपणे इकडेतिकडे पाहू लागतो. तेवढ्यात शिबानी पुन्हा एकदा कपिलला डिवचत म्हणते की, "मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही?" हे विचारुन शिबानी पुन्हा एकदा कपिलला निरुत्तर करते. शो पाहण्यासाठी आलेले सारेजण कपिलवर हसतात, पण कपिल एवढा ओशाळतो की, त्याला काय बोलावं तेच सुचत नाही.
कपिल शर्मा शोमधली ही छोटीशी क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ फार जुना आहे, पण सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठी-हिंदी भाषेच्या वादामुळे पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. तसेच, या जुन्या व्हिडीओवरुन कपिल शर्माला ट्रोल केलं जात आहे.
शिबानी दांडेकरनंतर सोनाली कुलकर्णीनंही घेतलेली मराठी भाषेवरुन कपिल शर्माची फिरकी
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रवी किशन आणि अभिनेते सचिन खेडेकर हे 'द व्हिसल ब्लोअर' या वेबसिरीजच्या प्रोमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये आलेले. या शोमध्ये तिघेही कपिल शर्मासोबत मजा मस्ती करताना दिसले. याचवेळी, सोनालीनंही शिबानीप्रमाणेच कपिलची मराठी भाषेवरुन चांगलीच फिरकी घेतली आहे.
सोनाली कपिलला बोलते की, "तू हिंदी आणि इंग्रजीमध्येच बोलणार का? मराठीत बोल थोडं. मुंबईत तुझा शो शूट होतो. इतकं छान वाटतं मला तुला भेटून. हो की नाही अर्चना. त्याने मराठी बोलायला पाहिजे ना. म्हणजे मी, सचिन आणि रवीला पण फार छान मराठी येतं. अर्चनाला तर फारच सुंदर मराठी येतं. हो की नाही अर्चना. तू मला द व्हिसल ब्लोअरच्या कॅरेक्टरमध्येच भेट म्हणजे मी तुला असं हँडअप करुनच भेटेन. मुंबईत राहातोस, आमच्यासोबत इतकं इकडेतिकडे शुटिंग करतोस, इतके सगळे छानछान कलाकार आहेत आणि तू आमच्याशी मराठी बोलत नाहीस."
महत्त्वाच्या इतर बातम्या :