Black Magic Angle in Shefali Jariwala Death: 'कांटा लगा' स्टार शेफाली जरीवाला यांचा जून 2025मध्ये मृत्यू झाला. वयाच्या 42 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफाली जरीवाला यांच्या मृत्यूनंतर मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती.  त्यांच्या अचानक निधनामुळे चाहते तसेच कलाकारांना मोठा धक्का बसला. दरम्यान, अलिकडेच शेफालीचा पती पराग त्यागीने एक पॉडकास्टमध्ये धक्कादायक दावा केला आहे.  त्यानं आपल्या बायकोवर काळी जादू केली असल्याचा दावा केला आहे. त्याने केलेल्या दाव्यामुळे नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Continues below advertisement

पराग त्यागीने पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये शेफालीबाबत मोठा दावा केला. परागच्या दाव्यावर पारस म्हणाला, "शेफालीवर कुणी काळी जादू केली असेल, असं मला नाही वाटत". तेव्हा पराग म्हणाला,  "काही लोक या गोष्टीवर नाही विश्वास ठेवणार. पण मी या गोष्टी मानतो. तिथे देव आहे, तिथे काळी जादू देखील आहे. आजकालचे लोक स्वत:च्या दु:खापेक्षा दुसऱ्या सुखामुळे दु:खी आहेत", असं पराग पॉडकास्टमध्ये म्हणाला.

"मला माहित आहे की हे कुणीतरी केलं आहे.  मी आता सांगू शकत नाही, हे नेमकं कुणी केलं आहे. पण मला सतत जाणवत आहे, काहीतरी चुकीचं घडलं आहे. हे एकदा नाही तर, दोनदा घडलं आहे.  जेव्हा मी देवाचे ध्यान करण्यासाठी बसतो,  तेव्हा मला जाणवतं, की काहीतरी मोठी चूक घडली आहे", असं पराग म्हणाला.  "माझा पंचमुखी हनुमानावर खूप विश्वास आहे. दर शनिवारी मी पुजा करतो", असंही पराग म्हणाला.

 शेफालीच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं, याबाबत सांगताना पराग म्हणाला, "ही घटना 27 जून रोजी घडली होती. याआधी गेल्या नोव्हेंबरमध्ये आमच्या घरी काही लोक आले होते. त्या लोकांनी पंचमुखी हनुमानजी घरी ठेवू नये असे सांगितलं. त्या वेळी परीने मला ती गोष्ट पटवून दिली.  आज मला जाणवतं की ती गोष्ट फार मोठी चूक होती. मी अनेक वर्षांपासून माझ्यासोबत असलेल्या हनुमानजींचे विसर्जन केले होते. त्यानंतर मला फार वाईट वाटलं.  मी खूप रडलो. मी पुन्हा त्या ठिकाणी गेलो.  मात्र, तेथे हनुमानजींचा फोटो नव्हता. त्यानंतर मी दररोज तिथे जाऊन त्यांचा शोध घेत राहिलो. परंतु, मला पुन्हा सापडलं नाही. मी मनापासून माफी मागितली आणि हनुमानजींना सांगितलं की माझ्याकडून फार मोठी चूक झाली. तुम्ही मला माफ कराल, तेव्हा पुन्हा परत या. त्यानंतरच ही दुर्दैवी घटना घडली", असं परागने सांगितलं.

"अलीकडे जेव्हा मी दिल्लीला गेलो होतो, तेव्हा तिथे मला एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीने मला पंचमुखी हनुमानजी दिले. मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. जेव्हा ते हनुमानजी मला मिळाले, तेव्हा मी अक्षरशः रडू लागलो. मी त्यांचे आभार मानले. मला शंभर टक्के खात्री आहे की शेफालीसोबत कुणीतरी काहीतरी चुकीचं केलं आहे. आणि ज्याने हे कृत्य केलं आहे, त्याला मी सोडणार नाही", असंही पराग म्हणाला.