Shantanu Moghe On Priya Marathe: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्रिया मराठेचं (Priya Marathe) गेल्यावर्षी निधन झालं. अनेक वर्षांपासून ती कॅन्सरशी लढा देत होती. तिच्या अचानक निघून जाण्याने कलाविश्वावर फार मोठा आघात झाला होता. मालिका विश्वातून आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची ती लाडकी ठरली. प्रत्यक्ष आयुष्यात अनेकांची ती चांगली आणि जवळची मैत्रिण होती. प्रियाला गमावल्यानं आजही अनेकजण हळहळतात. कॅन्सरशी झुंज देत असल्यामुळे प्रियाने मालिका विश्वातूनही ब्रेक घेतला होता.  पत्नीची काळजी घेता यावी म्हणून शंतनू मोघेही( Shantanu Moghe) मध्यंतरी अनेक महिने कोणतही काम घेत नव्हता. प्रियाच्या जाण्यानंतर काही दिवसांनी शंतनू पुन्हा मालिका विश्वास सक्रिय झाला. सध्या शंतनूची 'मोहिनी' या मालिकेची चर्चा आहे.अलीकडेच 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत शंतनू पहिल्यांदाच व्यक्त झाला. प्रियाच्या आजारपणाच्या लढाईत हरल्याचं त्यानं सांगितलं.

Continues below advertisement

काय म्हणाला शंतनु मोघे? ( Shantanu Moghe on Priya Marathe)

प्रियाच्या आजारपणाच्या काळाविषयी बोलताना  शंतनू म्हणाला, " आयुष्य पुढे जात राहतं. जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. खरंतर तिनं त्या काळात फार धैर्याने सामना केला. पण, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आजारपणाच्या त्या लढाईत आम्ही हरलो. "

तो पुढे म्हणाला " प्रत्येकाचा आयुष्य वेगळं असतं. त्याची जडणघडण वेगळ्या प्रकारे होत असते. शेवटी आपलं आपल्याकडे, एवढंच मी म्हणेन. मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती,ते काम प्रियाला खूप आवडलं होतं. सुरुवातीला आम्ही दोघांनी 'या सुखांनो या ' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. पण त्यात आमचे सीन्स कधी एकत्र नव्हते. तिला मी केलेलं एक सफरचंद नावाचं नाटकही खूप आवडलं होतं. ' असं तो म्हणाला.

Continues below advertisement

दर्जेदार भूमिकांमधून लक्षात राहिली

प्रिया मराठेने 2005 साली 'या सुखांनो या ' हे मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. 'तू तिथे मी' 'चार दिवस सासूचे' 'तुझेच मी गीत गाता आहे ' या मालिकांमधील तिच्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. विशेषतः तिच्या खलनायकी भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हिंदी मालिकांमध्ये ही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. 'पवित्र रिश्ता', 'साथ निभाना साथिया' मालिकेतही जा नकारात्मक पण ठसठशीत भूमिका होत्या.