Shahid Kapoor Upcoming Movie Deva Poster: बॉलिवूडचा (Bollywood) चॉकलेट बॉय शाहीद कपूरचा (Shahid Kapoor) आगामी चित्रपट 'देवा'चं (Deva Movie) पोस्टर रिलीज झालं आणि एकच चर्चा रंगली. त्या पोस्टरमध्ये शाहीद दिसत होता, पण त्याच्या मागे एक पोस्टर होतं, त्यावर होता दिवार चित्रपटातला विजय वर्मा. म्हणजेच, बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan)... त्या पोस्टरपुढे उभ्या असलेल्या शाहीदचा लूकही दिवारमधल्या अमिताभच्या लूकशी तंतोतंत मिळता-जुळता. चाहत्यांना वाटलं शाहीदच्या देवामध्ये अमिताभही दिसणार, त्यामुळे अनेकांची उत्सुकता वाढली. पण, खरं कारण काहीतरी वेगळंच होतं. ते सांगितलंय चित्रपटाचे दिग्दर्शक रोशन अँड्र्यूज यांनी.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोशन अँड्र्यूज यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'देवा'च्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये झळकलेल्या दिवारमधील अमिताभ बच्चन यांच्या पोस्टरबाबत माहिती दिली आहे. यामुळे चाहत्यांना पडलेलं कोडं सुटलं आहे आणि त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'देवा'च्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन यांची झलक का आहे? तर भारतीय चित्रपटसृष्टीवर बच्चन यांचा कायमस्वरूपी प्रभाव कसा प्रतिबिंबित करतो, हे दिग्दर्शकानं स्पष्ट केलं आहे.
दिग्दर्शक अँड्र्यूज म्हणाले की, "जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईला आलो, तेव्हा मी ट्रेन, बस, ऑटो आणि टॅक्सीनं सगळीकडे फिरलो. दक्षिण मुंबईत मी लता मंगेशकर, राजेश खन्ना आणि दिलीप कुमार साहेबांसारख्या नामवंत व्यक्तींची खूप सारी ग्राफीटी पाहिली. यामुळे 'देवा'साठीही का बनवू नये? असा विचार आला आणि मी ते केलं. अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता असल्यानं मी त्याचा चित्रपटात समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देवाच्या पोस्टरमध्ये दिवारमधला विजय वर्मा तुम्हा सर्वांना दिसला."
दिग्दर्शक रोशन अँड्र्यूज म्हणाले की, "देवाच्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन यांचं असणं महत्त्वाची भूमिका बजावतं. ज्यावेळी तुम्ही फिल्म पाहाल, त्यावेळी तुम्हाला याचं महत्त्व लक्षात येईल."
अलीकडेच, चित्रपट निर्मात्यांनी आगामी 'देवा' चित्रपटातील शाहिद कपूरचा फर्स्ट लूक शेअर केला. ज्यामध्ये तो एका दमदार लूकमध्ये दिसला. पोस्टरमध्ये शाहीदच्या हातात सिगारेट असून त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच राग दिसत आहे. त्याच्या पाठीमागे 1990 च्या दशकातील अमिताभ बच्चन यांचं दिवार चित्रपटातील फोटो आहे, जो जुन्या आठवणी ताज्या करतो.
इंस्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना, अभिनेता शाहिद कपूरनं लिहिलं की, "लॉक अँड लोड 'देवा' 31 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये भेटुयात!” झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्सनं 'देवा'ची निर्मिती केली आहे. आगामी ॲक्शन थ्रिलरमध्ये शाहीद कपूरसोबत पूजा हेगडे आणि पावेल गुलाटी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शाहीद म्हणाला की, "हा एक ॲक्शन चित्रपट आहे आणि त्यात थ्रिलही आहे. आशा आहे की, चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला हे कोणी केलं, असा प्रश्न शेवटपर्यंत पडेल"