Shahid Kapoor On Bollywood Movies: गेल्या काही वर्षांपासून असं म्हटलं जातंय की, प्रेक्षक आता बॉलिवूड (Bollywood News) इंडस्ट्रीला कंटाळले आहेत. त्यांना तेच-तेच जुने सिनेमे पहायचे नाहीत. त्यांना 'धुरंधर'सारखा (Dhurandhar Movie) एक अनोखा, मसाला असलेल्या सिनेमात रस आहे. अशातच नुकतंच एका दिग्गज बॉलिवूड अभिनेत्यानं हिंदी सिनेसृष्टीतील विचित्र बदलाबाबत केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या 'ओ रोमियो' सिनेमामुळे चर्चेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरनं विचित्र वक्तव्य केलं आहे. या सिनेमासाठी सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या शाहीद कपूरनं प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टवर आजच्या सिनेसृष्टीतील बदलांबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, लोकांचं लक्ष दीर्घकाळ टिकवून ठेवणं हे एक आव्हान बनलं आहे. बॉलिवूडमध्ये लोकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी पुरेसे चांगले सिनेमे बनत नाहीत, हेही शाहीद कपूरनं मान्य केलं.
शाहीद कपूर नेमकं काय म्हणाला? (Shahid Kapoor On Bollywood Movies)
बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर बोलताना म्हणाला की, "प्रेक्षक धीर गमावत आहेत. त्यांचं मन आता एकाग्र होऊ शकत नाही. त्यांना सतत काहीतरी नवीन हवं असतं, त्यांना विश्रांतीची आवश्यकता असते, कारण या सर्व गोष्टी त्वरित समाधानासाठी असतात. निर्माते स्वतःशीही असंच वागतात. म्हणून जेव्हा ते बसून काम करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांची सर्जनशीलता कमी होते. असं नाही की, प्रेक्षक चित्रपट पाहू इच्छित नाहीत. मुद्दा असा आहे की, आपण पाहिजे तितके चांगले चित्रपट बनवत नाही. म्हणून, हे दोन्ही बाजूंनी घडतंय. प्रेक्षक आणि निर्माते यात सहभागी आहेत."
"लोकांना समजत नाही, पण हा आयुष्यातील एक चमत्कार आहे की लोकांनी भरलेलं एखादं सभागृह खरोखर टाळ्या वाजवतंय, शिट्ट्या मारतंय आणि तुम्हाला ती ओळख मिळवून देतंय, तुम्हाला स्वतःपेक्षा मोठे स्थान देतंय..ही खूप सुंदर गोष्ट आहे. म्हणूनच कला खास असते. पण जेव्हा त्यात काहीतरी बनावट शिरते तेव्हा ते तसे नैसर्गिक वाटत नाही. मार्केटिंग ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला करावीच लागते— तुम्हालाही करावी लागते आणि मलाही. पण मार्केटिंग 'योग्य' आणि 'अयोग्य' मधील रेषा कधी ओलांडते? हे सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या नैतिकतेच्या जाणिवेवर अवलंबून असते. जर तुम्ही त्या भावनेतून काम करणे निवडले, तर ती गोष्ट वेगळी असते. पण जर तुम्ही फक्त व्यवसाय आणि आकड्यांसाठी काम करत असाल तर शेवटी ते फक्त व्यवसाय आणि आकडेच राहतात.", असं शाहीद कपूर म्हणाला.
दरम्यान, शाहीद कपूरच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा 'ओ रोमियो' हा सिनेमा 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर, तो 'कॉकटेल 2' या सिनेमातही दिसणार आहे, ज्यामध्ये कृती सेनॉन आणि रश्मिका मंदाना देखील झळकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
