धुरंधरच्या 'आंधी बनके' गाण्याला शाहिदच्या 'ओ रोमिओ'तील गाण्याची टक्कर?, अवघ्या 24 तासांत 10 लाख व्हूज पार
शाहिद आणि दिशामधील केमिस्ट्रीही चर्चेचा विषय ठरत आहे. गाण्याला अवघ्या 24 तासांत सुमारे 10 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

O Romio Song: धुरंधर चित्रपटाने केवळ कथानकच नाही तर यातील गाण्यांनीही जबरदस्त हवा केली. 'आंधी बनके आया हुं' हे गाणं तर अजूनही सोशल मिडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. दरम्यान, आता या गाण्याला टक्कर देणारं एक गाणं अखेर आलं आहे. हे गाणं आहे अभिनेता शहीद कपूर आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या 'ओ रोमिओ' सिनेमातलं. 'पान की दुकान' असं या गाण्याचं नाव आहे. गाणं रिलीज होताच सुमारे 10 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
'आंधी बनके' गाण्याला 'ओ रोमिओ'च्या गाण्याची टक्कर
‘ओ रोमियो’मधील ‘पान की दुकान’ हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. या गाण्यात शाहिद कपूर आपल्या दमदार डान्स स्टेप्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतो. गाण्यात अभिनेत्री दिशा पाटनीही झळकली असून, काळ्या रंगाच्या सलवार सूटमधील तिचा लूक प्रेक्षकांना विशेष भावला आहे. तिच्या बदललेल्या अंदाजाचं जोरदार कौतुक केलं जात आहे. शाहिद आणि दिशामधील केमिस्ट्रीही चर्चेचा विषय ठरत आहे. गाण्याला अवघ्या 24 तासांत सुमारे 10 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
कधी होणार 'ओ रोमिओ' प्रदर्शित?
‘ओ रोमियो’ या चित्रपटात नाना पाटेकर, अविनाश तिवारी, तमन्ना भाटिया, दिशा पाटनी, फरीदा जलाल आणि विक्रांत मॅसी यांच्याही भूमिका आहेत. या अॅक्शन थ्रिलरचं लेखन आणि दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केलं असून, साजिद नाडियाडवाला यांनी नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ‘मुंबईची माफिया क्विन्स’ या पुस्तकावर आधारित असून, 13 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
कायदेशीर वाद
दरम्यान, या चित्रपटावर कायदेशीर वादही निर्माण झाला होता. कुख्यात गुंड हुसैन उस्ताराची मुलगी सनोबर शेख हिने चित्रपटात वडिलांचं चुकीचं चित्रण करण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असून, ठरलेल्या तारखेलाच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूरने याआधी दिलेल्या एका मुलाखतीत आपण मुद्दाम ग्रे शेड असलेल्या भूमिका निवडत असल्याचं सांगितलं होतं. अशा भूमिका अधिक वास्तववादी आणि आव्हानात्मक वाटतात, असं त्याने स्पष्ट केलं होतं.
गाण्याच्या लॉन्चदरम्यान गोंधळाची परिस्थिती
शुक्रवारी मुंबईत अभिनेता शाहिद कपूर आपल्या आगामी चित्रपट ‘ओ रोमियो’च्या ‘पान की दुकान’ या गाण्याच्या लॉन्चसाठी उपस्थित होता. यावेळी अचानक चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने कार्यक्रमात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शाहिदने काही चाहत्यांना मंचावर येण्यासाठी आमंत्रित केलं होतं. मात्र काही क्षणांतच अनेक जण मंचावर चढले आणि त्याच्या भोवती गर्दी जमली.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत शाहिदला गर्दीतून बाहेर काढलं. काही वेळासाठी शाहिद मंचावरून खाली गेला होता. मात्र परिस्थिती निवळल्यानंतर तो पुन्हा मंचावर परतला आणि कार्यक्रमात सहभागी झाला. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा शाहिद अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत चित्रपटाचं प्रमोशन करत होता.
























