O Romio: शाहिद कपूर अभिनीत आणि विशाल भारद्वाज दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘ओ’ रोमियो’ सध्या वादात सापडला आहे. मुंबईच्या अंडरवर्ल्डशी जोडल्या गेलेल्या दिवंगत हुसेन उस्ताराची मुलगी सनोबर शेख यांनी चित्रपटाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या खटल्यात निर्माता साजिद नाडियाडवाला, दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि लेखक हुसेन झैदी यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. हा चित्रपट झैदी यांच्या ‘माफिया क्विन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर प्रेरित असल्याचं सांगितलं जात असून, शाहिद कपूर हुसेन उस्ताराशी संबंधित मध्यवर्ती भूमिका साकारत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

चित्रपटावर कायमची बंदी घालावी

सनोबर शेख यांनी मुंबईच्या सिव्हिल कोर्टात अर्ज दाखल करत, ‘ओ रोमियो’च्या रिलीजवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की हा चित्रपट त्यांच्या वडिलांची अनधिकृत बायोपिक आहे आणि कुटुंबाची कोणतीही परवानगी न घेता तो तयार करण्यात आला आहे. सनोबर यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट केवळ व्यावसायिक फायद्यासाठी तयार करण्यात आला असून, त्यात हुसेन उस्तार यांच्या आयुष्याचं चुकीचं आणि हानिकारक चित्रण करण्यात आलं आहे. कुटुंबाची संमती न घेता अशी बायोपिक बनवणं चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘गँगस्टर नव्हे, तर पडद्यामागचा हिरो’

अर्जात सनोबर यांनी वैयक्तिक वेदनाही मांडल्या आहेत. चित्रपटात त्यांच्या वडिलांना गँगस्टर म्हणून दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चित्रपट रिलीज झाल्यास त्यांच्या कुटुंबाची, तसेच त्यांच्या मुलांची प्रतिमा कायमची खराब होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सनोबर यांनी याचिकेत असा दावा केला आहे की, हुसेन उस्तार यांनी मुंबईतील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आणि गुप्त यंत्रणांना गुप्तपणे मदत केली होती. देशाच्या सुरक्षेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीला चित्रपटात खलनायक दाखवणं अन्यायकारक असल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे.

आधीही पाठवली होती कायदेशीर नोटीस

‘ओ रोमियो’चा टीझर रिलीज झाल्यानंतर सनोबर शेख यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात वडिलांचं चुकीचं चित्रण झाल्याचा आरोप करत, त्यांनी 2 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणीही केली होती. ‘ओ रोमियो’मध्ये शाहिद कपूरसोबत तृप्ती डिमरी पहिल्यांदाच झळकणार आहे. चित्रपटाचे निर्माता साजिद नाडियाडवाला असून, हा चित्रपट 13 फेब्रुवारीला रिलीज होणार होता. मात्र आता हा वाद न्यायालयात गेल्याने चित्रपटाच्या भवितव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.