Sayaji Shinde On NCP Merger: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित दादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. अजित दादांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झालीय ही पोकळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही जाणवत राहणार आहे. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले आहेत. आज सुनेत्रा वाहिनी यांच्यासह मोठ्या साहेबांना भेटल्याचंही त्यांनी सांगितलं.
Sayaji Shinde: काय म्हणाले सयाजी शिंदे?
"अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्र निःशब्द झालाय.काहीतरी सुचावं यालादेखील वेळ जातोय. काही सुचत नाही. आज सुनित्रा वहिनींची भेट घेतली. काय बोलावं काही कळत नव्हत.त्यानंतर मोठ्या साहेबांचीसुधा भेट घेतली. मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. खरंतर अशी चर्चा झाली होती, निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला की आता एकत्रच येणार आहे. आता फक्त औपचारिकता राहिलीय. हे होत असताना असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालं. दादांचा जो उमदा स्वभाव, निर्णय घेण्याचा स्वभाव पुन्हा महाराष्ट्रात यावा या दृष्टीने दादाचं स्वप्न पूर्ण व्हावं. आणि ताकद वाढवायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. यानिमित्ताने मला हे सांगावंसं वाटतं. झालेल्या दुःखावर आपण काही बोलू शकत नाही सध्या. कोणीच काही बोलू शकत नाही." असं अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले.
शरद पवारांचे आमदार रोहित पवारांनी येत्या 12 तारखेला पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे. सुनील शेळके अजितदादांची पवार कुटुंब आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांशी विलीनीकरणाची चर्चा झाली असेल, असे म्हणाले. दादांच्या अचानक जाण्याने मीटिंग कोणी बोलवायची? जर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत, तर त्यांनी जबाबदारीने पाऊल उचलले तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? असा सवाल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. ज्या नेत्याने मला 30-40 वर्षे सांभाळले, त्यांच्या निधनानंतर मी जे सत्य घडले तेच बोललो आहे, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
