Nora Fatehi Song Controversy: कन्नड चित्रपटातील ‘केडी: द डेविल’ मधील ‘सरके चुनर’ (Sarke Chunar) या गाण्यावरून सध्या मोठा गदारोळ उडालाय. गाण्याच्या कथित अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांमुळे तीव्र टीका होतेय. हा वाद इतका वाढला की चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे गाणे यूट्यूबसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेत निर्मात्यांना नोटीसही पाठवली आहे. दरम्यान, या गाण्याचे गीतकार म्हणून नाव जोडले गेलेले रकीब आलम यांनीही या वादापासून स्वतःला दूर केले आहे. त्यांनी हे गाणे लिहिलेले नाही असं म्हणत अंग काढून घेतलं. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रेम यांनी त्यांच्याकडून फक्त कन्नड गाण्याचे शब्दशः भाषांतर करून घेतले होते, असे त्यांनी सांगितलं.
दरम्यान आता या संपूर्ण वादावर दिग्दर्शक प्रेम यांच्या पत्नी आणि अभिनेत्री रक्षिता यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बचाव करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी लोकांच्या ‘डबल स्टँडर्ड’वर प्रश्न उपस्थित करत विचारलं की, जेव्हा ‘चोली के पीछे’ किंवा ‘पीलिंग्स’ सारखी गाणी लोकप्रिय ठरतात, तेव्हा कोणी प्रश्न उपस्थित करत नाही; मग ‘सरके चुनर’वरच एवढा आक्षेप का घेतला जात आहे? त्यांची ही प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय आहे.
काय म्हणाली दिग्दर्शकाची पत्नी?
रक्षिता यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, "आजकाल प्रेक्षक हिंसक आणि लैंगिक आशय असलेला कंटेंट मोठ्या प्रमाणावर पाहतात. अशा परिस्थितीत एका गाण्यालाच लक्ष्य का केले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. “मी या गाण्याच्या बाजूने आहे की विरोधात, हा मुद्दा नाही; पण इतकी गाणी आली आणि ती सर्व स्वीकारली गेली, मग या गाण्यावरच एवढा गदारोळ का?” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, कंगना रणौत,रवि किशन, अरमान मलिक आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर आक्षेप नोंदवला आहे. गाण्यात समाजात अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे गाणे नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, ‘केडी: द डेविल’ हा चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. गाण्यावरून निर्माण झालेला वाद अद्याप कायम असून पुढे निर्माते किंवा कलाकारांकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे.
