Ashok Saraf and Nilu Phule Movie: दिवंगत अभिनेते निळू फुले (Nilu Phule) आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी सुरुवातीच्या काळात अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. त्यांचा चित्रपटांचा एक चाहतावर्ग आहे. दोघांनीही एकत्रित आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशोक सराफ आणि निळू फुले यांनी एकत्र दीड शहाणे, माझा पती करोडपती, गडबड घोटाळा, बिन कामाचा नवरा, गल्ली ते दिल्ले, मोसंबी नारंगी, वाघीण, दिसतं तसं नसतं यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. या जोडीला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. अशोक सराफ यांचा 'आदि अनंत' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमात अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये दोन्ही कलाकार व्यस्त आहेत. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे या दोघांनी अलिकडेच एबीपी माझाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत संकर्षण कऱ्हाडेने अशोक सराफ आणि निळू फुले यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला.
संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला निळू फुले अन् अशोक सराफ यांचा एक किस्सा (Sankarshan Karhade on Ashok Saraf and Nilu Phule)
संकर्षण कऱ्हाडे म्हणाला की, 'अशोक सराफ यांच्याबाबतीत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. माझं काम चांगलं होईल या अट्टाहास बरोबर, तुझं काम चांगलं व्हावं, ही इच्छा आणि प्रयत्न हे भयंकर शिकण्यासारखं आहे. ते नेहमी उदाहरण देतात की, निळू फुले आणि अशोक सराफ एकत्र एका प्रोजेक्टवर काम करत होते. त्यांना दिग्दर्शक म्हणाला की, Improvise करा. तेव्हा निळू फुले यांना म्हणाले होते की, 'अरे मगाशी घेतलेलं तू महत्त्वाचं वाक्य खूप छान घेतलं होतं. ते पुन्हा घेतलं नाहीस?' त्यांनी समोरच्या व्यक्तीचं काम चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न केला'.
'मी परवा त्यांना म्हटलं की, आपले सिनिअर आपल्याला काय देतात, ते जर आपण आपल्याकडेच ठेवलं तर, आपण कधी सिनिअर होत नाही. फक्त वाढत जातो. या अर्थाने तुम्ही खरंच सिनिअर झाला आहात. त्यांनी मला सिनेमात असं नको, असं कर, असे मार्गदर्शन दिले. वाक्याला अधिक हातवारे न करता डोळ्यांनी अभिनय कर, असं मला त्यांनी सांगितलं होतं. माझं काम कसं चांगलं होईल, हे सांगितलं', असं संकर्षण कऱ्हाडे म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
