संजय दत्त अचानक योगी आदित्यनाथांच्या भेटीला, उत्तर प्रदेशमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उधाण
Sanjay Dutt Yogi Adityanath meeting: अभिनेता संजय दत्तनं घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट. फोटो शेअर चाहत्यांना दिली माहिती. राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चांना उधाण.

Sanjay Dutt Instagram post after meeting UP CM: अभिनेता संजय दत्त हा कायम कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. धुरंधर या चित्रपटातील भूमिकेमुळे तो प्रकाशझोतात आला होता. तो सोशल मीडियातही सक्रीय असतो. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होतात. दरम्यान, अलिकडेच त्याचा एक फोटो समाजमाध्यमांमध्ये तुफान व्हायरल होत आहे. त्यानं नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. सोमवारी, संजय दत्तने त्याच्या इन्स्टाग्रामवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसोबतचा फोटो शेअर केला. फोटोमध्ये दोघेही हस्तांदोलन करताना दिसत आहे. त्यानं फोटो शेअर करुन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा अनुभवही शेअर केला. सध्या संजय दत्तची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अभिनेता संजय दत्तने सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सदिच्छा भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी संजय दत्त लखनऊला पोहोचला होता. भेटीनंतर संजय दत्तने त्याच्या चाहत्यांना माहिती देण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्याने भेटीदरम्यानचा फोटो शेअर केला. त्यानं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'लखनऊमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. हा एक अतिशय आनंददायी अनुभव होता. या संभाषणाबद्दल आणि तुमच्या शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद', असं कॅप्शन देत अभिनेत्यानं पोस्ट शेअर केली.
फोटोमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संजय दत्त अत्यंत आनंदी दिसत आहेत. मुख्यमंत्री आणि अभिनेता संजय दत्तला एकत्र पाहून चाहते या फोटोवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. यावेळी संजय दत्तचा सत्कारही करण्यात आला. दरम्यान, संजय दत्त राजकारणात एन्ट्री घेणार का? संजय दत्त उत्तर प्रदेशमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या आठवड्यात, आमदार राजेश्वर सिंह यांच्या निमंत्रणावरुन संजय दत्त हे लखनऊला पोहोचले होते. लखनऊमध्ये त्याने 'जीरो नेट 2040' साठी 1 किलोमीटरपर्यंत रोड शो केला होता. संजय दत्तची एन्ट्री होताच, त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. 'जय श्री राम'च्या घोषणेने संपूर्ण नगरी दुमदुमली. यावेळी अभिनेत्याने तरुणांना पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सल्ला दिला. रोड शो दरम्यान, संजय दत्तची एक झलक पाहण्यासाठी तरुण आणि वृद्ध लोकांची गर्दी जमली होती. लोकांनी संजय दत्तसोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. सध्या संजय दत्तचा लखनऊदरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
कामाच्या बाबतीत, संजय दत्त शेवटी धुरंधर या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील त्याची भूमिका उल्लेखनीय ठरली. प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. आगामी काळात संजय दत्त धुरंधर 2, द गुड महाराजा, केडी : द डेव्हिल सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. संजय दत्तच्या आगामी प्रकल्पांबद्दल चाहते उत्सुक आहेत.
























