Sangali News: अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
Sangli News: अभिनेत्री राजकन्या भाग्यश्री यांनी आरतीचा मान घेतला, पण त्यावेळी संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन उत्तराधिकारी असताना आरतीचा मान घेतल्यानं व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि अभिनेत्री भाग्यश्री यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.

Sangli Ganpati Panchayatan Sansthan Aarti Controversy: सांगलीच्या (Sangli) राजघराण्यातील वाद ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav) चव्हाट्यावर आला आहे. सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या (Sangli Ganpati Panchayatana Sansthan) उत्तराधिकारी पदावरून आता सांगलीचे राजे पटवर्धन कुटुंबातील वाद उफळण्याची शक्यता आहे. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन (Shrimant Vijaysinh Raje Patwardhan) यांच्या कन्या आणि बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्री राजकन्या भाग्यश्री पटवर्धन-दासानी (Bhagyashree Patwardhan-Dasani) यांनी चार वर्षांनंतर सांगलीत येऊन मंदिरात उत्सव मूर्तीची आरती केली. नूतन युवराज आदित्यराजे यांना डावलून आरतीचा मान घेतल्यानं वादाला सुरुवात झालीय. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली असून सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी कोण? यावरून पटवर्धन कुटुंबातील वाद उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अभिनेत्री राजकन्या भाग्यश्री (Bhagyashree Patwardhan-Dasani) यांनी आरतीचा मान घेतला, पण त्यावेळी संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन उत्तराधिकारी असताना आरतीचा मान घेतल्यानं व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि अभिनेत्री भाग्यश्री यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी भाग्यश्री आणि पती हिमालय दासानी यांनी गैरकारभार केल्यानं त्यांना संस्थानातून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. तर, दत्तकपुत्र आदित्यराजे हेच कायदेशीर उत्तराधिकारी असल्याचं सर्वांसमोर नव्यानं जाहीर केलंय.
नेमकं घडलं काय?
गणेश चतुर्थीच्या दिवशी सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आरतीची तयारी करण्यात आली आणि यासाठी नूतन युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना बोलावण्यात आलं. पण, त्यांना थांबवत भाग्यश्री यांनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि उत्सव मूर्तीची आरती केली. या घटनेमुळे मंदिर परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर आरती करण्याचा अधिकार आपल्याला असल्याचा दावा भाग्यश्री पटवर्धन यांनी केला. पण, त्यांनी थेट आरतीचा मान घेतल्यानं त्यांचे वडील विजयसिंह राजे पटवर्धन यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, आरतीचा मान आदित्यराजे यांनाच आहे, असंही स्पष्ट केलं.
विजयसिंह राजे पटवर्धन यांनी आदित्यराजे यांना आपण राजकुमार म्हणून जाहीर केलं असून तेच संस्थानाचे पुढील उत्तराधिकारी असतील, असं स्पष्ट केलं. भाग्यश्री आणि त्यांचे पती हिमालय दासानी यांच्याशी संस्थानच्या मालमत्तेबाबत व्यवहार करू नये, असंही त्यांनी खडसावून सांगितलंय.
वादाची ठिणगी पडली कुठून?
काही वर्षांपूर्वी सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या कारभाराची जबाबदारी भाग्यश्री यांचे पती हिमालय दासानी यांच्याकडे होती. पण, संस्थानाच्या जमिनी परस्पर विकल्याचा आरोप झाल्यानंतर खळबळ माजली आणि हिमालय दासानी यांच्याकडून सर्वच्या सर्व अधिकार काढून घेण्यात आले.
2016 ते 2021 या काळात विजयसिंह राजे यांनी कारभार पाहिला. 2021 मध्ये त्यांनी जयदीप अभ्यंकर यांच्याकडे संस्थानची सूत्रं सोपवली. त्यानंतर 2023-24 मध्ये जयदीप अभ्यंकर यांचा मुलगा आदित्य याला विजयसिंह राजे यांनी दत्तक घेतलं आणि उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलं. सध्या आदित्यराजे यांचं वय 16 वर्ष आहे. अशातच आता अभिनेत्री आणि राजकन्या भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी थेट आरतीचा मान घेत, आपल्याकडेच अधिकार असल्याचं जाहीर केल्यानं वादाला चांगलीच फोडणी बसलीय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















