मुंबई : 'संगीत देवबाभळी' या नाटकाच्या निमित्तानं रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनेत्री शुभांगी सदावर्तेला आता एका वेगळ्या आणि नव्या भूमिकेतून पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळं तिची ही नवी भूमिका चाहत्यांसमवेत तिच्यासाठीसुद्धा उत्सुकता वाढवणारी ठरत आहे.


महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलीसी चातुर्य आणि साहसाच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची रोमांचक रितीने उकल करून सांगणारी ही मालिका.


मालिकेत अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पीआय मोक्षदा मनोहर मोहिते ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. संगीत देवबाभळी या नाटकाद्वारे शुभांगी घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतील मोक्षदा या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी आशा तिला आहे.


Jasprit Bumrah Marriage | बोहल्यावर चढतोय बुमराह? बहुचर्चित प्रेमप्रकरणांची सुरुये चर्चा


नव्या भूमिकेविषयी सांगताना शुभांगी म्हणाली, ‘मोक्षदा मोहिते असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. ती प्रत्येक प्रसंगांचा, घटनेचा आणि गुन्ह्यांचा सगळ्या बाजूने विचार करते आणि मगच तिचं मत मांडते. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तिच्या मनात प्रचंड राग आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये तिची दहशत आहे. खऱ्या आयुष्यातही जर अन्यायाचा प्रसंग माझ्यासमोर उभा ठाकला तर माझ्यातली मोक्षदा जागी होते.' मोक्षदा ही व्यक्तिरेखा मनाला खूपच भावणारी अशी आहे. पोलिसांविषयी माझ्या मनात आदर होताच ही मालिका करताना हा आदर आणखी वाढला आहे. वर्दीची खरी किंमत जेव्हा ती शूटिंगच्या निमित्ताने आम्ही धारण करतो तेव्हा कळते असं म्हणत पोलिसांच्या मेहनतीची आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव असल्याची भावना तिनं व्यक्त केली.