Sandeep Pathak: राज्यात दुष्काळाचा दाह गावागावात पोहोचला आहे. जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. जगणं कष्टाचं होऊ लागलं आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना अभिनेता संदीप पाठक यांनी नागरिकांना पाणी बचतीचं आवाहन केलंय. “तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल,” असा इशारा देत त्यांनी पाण्याचं महत्त्व ओळखून प्रत्येकाने त्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत पाणीटंचाईचं संकट गडद होत असताना संदीप पाठक यांनी पाणी बचतीचा संदेश दिला आहे. पाण्याच्या प्रश्नावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संदीप पाठक?
“त्यांनी हे केलं नाही, आम्ही हे केलं, असे हेवेदावे करण्याची ही वेळ नाही,” असं म्हणत संदीप पाठक यांनी पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करण्याऐवजी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन केलं. प्रत्येक नागरिकाने पुढील वर्षभर पाणी वाचवण्याचा आणि इतरांनाही पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला पाहिजे, असं ते म्हणाले. पाणी ही केवळ वर्तमानातील गरज नसून भविष्यातील मोठं आव्हान ठरू शकतं. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपणं, अनावश्यक वापर टाळणं आणि आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनाही पाणी बचतीसाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ सरकारच्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. पाणी बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, असा संदेश अभिनेता संदीप पाठक यांनी म्हटलं.
राज्यभरात दुष्काळाचा चटका वाढला!
दुष्काळामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही, मात्र डोक्यावरचं कर्ज आणि घरखर्चाची जबाबदारी कायम आहे. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करायची कशी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. राज्यभरात दुष्काळाचा दाह वाढतो आहे. जलस्त्रोत आटले आहेत. धरण कोरडीठाक पडली आहेत. हातात उंडाशी आलेला घास करपून गेला आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांवर मोठी कठीण वेळ आली आहे. गावोगावी पंचनामे सुरू आहेत. पिण्यासाठी पाणी आणायचं कुठून?असे प्रश्न आ वासून उभे ठाकले आहेत.
