Sameer Wankhede Accuses Shah Rukh Khan Of Defamation: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यानं दिग्दर्शित केलेली 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' (Bads Of Bollywood) ही वेब सीरिज (Web Series) सध्या भलतीच चर्चेत आहे. अशातच आता एका प्रकरणामुळे शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि त्यांचा मुलगा आर्यन खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. या सीरिजविरोधात माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Former NCB officer Sameer Wankhede) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) मानहानीचा खटला दाखल केला आहे. समीर वानखेडेंनी हा खटला अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) विरुद्ध दाखल केला आहे.
समीर वानखेडेंनी याचिकेत आरोप केला आहे की, रेड चिलीज निर्मित आणि नेटफ्लिक्सवर प्रसारित होणारी 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सिरीजमधून खोट्या, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक बाबी सादर करण्यात आल्या आहेत. या सीरिजमध्ये ड्रग्जविरोधी अंमलबजावणी संस्थांना (Anti-Drug Enforcement Agencies) दिशाभूल करणाऱ्या आणि नकारात्मक दृष्टिकोनातून दाखवलं गेलं आहे, ज्यामुळे कायदा अंमलबजावणी संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो.
समीर वानखेडे यांचं म्हणणं आहे की, ही सीरिज जाणूनबुजून पक्षपाती आणि बदनामीकारक पद्धतीनं त्यांच्याविरुद्ध तयार करण्यात आली आहे, तर समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित खटला सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबईतील एनडीपीएस विशेष न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
याव्यतिरिक्त सीरिजमध्ये एक पात्र 'सत्यमेव जयते' असं म्हणत असल्याचं दाखवलं गेलं आहे, त्यानंतर लगेचच ते पात्र एक अश्लील हावभाव करतं. हे कृत्य राष्ट्रीय चिन्हाचा भाग असलेल्या घोषणेचा अपमान आहे आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 (Prevention of Insults to National Honour Act, 1971) अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.
याव्यतिरिक्त, सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या गोष्टी माहिती तंत्रज्ञान कायदा (Information Technology Act) आणि भारतीय दंड संहिता (आता भारतीय दंड संहिता - बीएनएस) च्या विविध कलमांचं उल्लंघन करते कारण ही सीरिज अश्लील आणि आक्षेपार्ह साहित्य वापरून राष्ट्रीय भावना दुखावण्याचा प्रयत्न करते.
दरम्यान, मानहानीच्या याचिकेत समीर वानखेडे यांनी 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे, जी कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा प्रस्ताव आहे.