मुंबई : 'राधे - युवर मोस्ट वाँटेड भाई' हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. येत्या 13 मेला हा चित्रपट येतो आहे. सिनेमाची गाणी, ट्रेलर सगळं लोकांसमोर आहे. सलमान खानचा चित्रपट असल्यामुळे हा सिनेमा आता हिट होणार अशी भाकितं वर्तवली जात होती. अर्थात सिनेमा आल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या भाईला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यापैकी पहिली मोठी अडचण आहे ती थिएटर्सची. 


राधे.. युवर मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपट झी प्लेक्ससह भारतातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. एकाचवेळी ओटीटी आणि थिएटर अशा दोन्ही स्तरांवर हा चित्रपट येणार असल्याने थिएटरवाले नाराज झाले होते. कारण लोकांना थिएटरमध्ये हमखास खेचणारे जे काही मोजके चित्रपट आहेत, त्यातला एक राधे असं मानलं जात होतं. राधेच्या निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मल्टिप्लेक्सवाले नाराज झाले. त्यांनी हा चित्रपट न लावण्याचा अलिखित निर्णय घेतला असल्याचं इंडस्ट्रीत बोललं जात होतं. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. सिंगल स्क्रीनमध्ये तर सिनेमा लागायचा प्रश्नच नव्हता. शिवाय, मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा जायची शक्यता हळूहळू संपत चालली होती. 


असं असताना भारतात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू लागले. महाराष्ट्राने तर लॉकडाऊन लावला होताच. पण आता कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी लॉकडाऊन लागले आहेत. साहजिकच तिथली थिएटर्स बंद झाली आहेत. त्यामुळे राधेच्या निर्मात्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. राधे हा चित्रपट ओटीटीवर येतानाच किमान 1000 स्क्रीन्सवर लावायचा अशी तयारी करण्यात आली होती. पण आता थिएटर्सच बंद असल्यामुळे या स्क्रीन्स कमी होणार आहेत. शिवाय, ज्या स्क्रीन्सवर चित्रपट लागेल, तिथे लोक जाऊन हा सिनेमा पाहतील की नाही अशी शंका आहे. कारण, देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता सध्या कोणीच थिएटरवर जाणार नाही अशी स्थिती आहे. असं असताना कलेक्शन कुठून येणार यावर राधेच्या गोटात खल चालू आहे. 


मिळालेल्या माहीतीनुसार राधे आणि निर्माती कंपनी झी.. यांच्यातही पुन्हा एकदा वाटाघाटी चालू असल्याचं कळतं. झी ने हा चित्रपट तब्बल 230 कोटी रुपये देऊन घेतला आहे. पण आता बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा पाहता झी प्लेक्सवरच सर्वांना अवलंबून राहावं लागणार आहे. राधे हा चित्रपट जगभरात रिलीज होतो आहे हे जरी खरं असलं तरी भारतातलं त्याचं गणित कोलमडण्याच्या अवस्थेत असल्याचं काही सिनेअभ्यासक सांगतात. 


नाव न सांगण्याच्या अटीवर मुंबईतले एक हिंदी सिनेविश्वातले अनुभवी  वितरक म्हणाले, सलमानचा चित्रपट थिएठरमध्ये जाऊन बघणारा प्रेक्षक मोठा आहे. पण थिएटर्सची सध्याची अवस्था बिकट आहे. मोबाईलवर तो उपलब्ध झाला आहे. पण तिथे बघून सिनेमॅटिक अनुभव घेता येत नाही. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सिनेमा पाहिला जाईल पण त्याचा परिणाम कितपत साधला जाईल यात शंका आहे. 


पायरसीचा धोका आहेच
राधे -युवर मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपट झी प्लेक्सवर येणार आहेच. पण या सिनेमाची पायरसी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आपल्याकडे अनेक ऑनलाईन रिलीज झालेले चित्रपट नंतर इतर एप्सवर आले. सेक्रेड गेम्सही यातून सुटला नाही. अशावेळी राधे ऑनलाईन आल्यावर पुढच्या काही तासांत त्याची पायरसी होईल. ती झाली तर निर्मात्यांना मिळणारे पैसे कमी होत जातील. तोही एक धोका आहे, असंही हा वितरक म्हणाला. म्हणूनच सलमान आणि निर्माती कंपनी यांच्यातल्या कराराचाही फेरविचार करण्याबद्दल विचारविनिमय सुरू झाला आहे.