Salman Khans Angry Video Mahira Khan Reaction: 'गोल्डन हार्टेड' भाईजान, म्हणजेच, अभिनेता सलमान खान (Salman Khan) चिडला आणि अख्खं सोशल मीडिया हादरलं. जो येईल तो सलमान खानच्या रागावर (Salman Khans Angry) बोलत होता. सलमान फक्त पॅपाराझींच्या कॅमेऱ्यासमोर चिडलाच नाहीतर, त्यानं मध्यरात्री तीन वाजता चार पोस्ट करुन थेट धमकीवजा इशारा दिला. त्यानं त्याच्या चार पोस्टमधून थेट सांगितलं की, मी साठीत आलोय, म्हणजे लढणं विसरलेलो नाही. अजूनही 100  जणांना एकटा लोळवू शकतो. सलमानचा पारा चढला त्यामुळे इंडस्ट्रीतही चर्चांना उधाण आलं. अशातच पॅपाराझींनी हिंदुजा रुग्णालयाबाहेरिल (Hinduja Hospital) प्रकारावर सलमान खानची माफी मागितली आणि सलमाननंही त्यांना मोठ्या मनानं माफ केलं. पण, सलमान खानच्या रागाचा भडका इथे उडाला, पण त्याची झळ थेट पाकिस्तानात पोहोचलीय.  

कधीकाळी सोशल मीडियावर खूपच सक्रीय असलेला सलमान खान, अलिकडच्या काही वर्षांत मात्र केवळ सिनेमांचं प्रमोशन आणि तत्सम इव्हेंटसाठीच वापर करताना दिसून आला. मात्र, सलमान खान यानं अचानक सोशल मीडियावर एकापाठोपाठ एक पोस्ट्स करत आपला संताप व्यक्त केला आणि त्यामुळे संपूर्ण सोशल मीडिया हादरलं. 

चाहत्यांचा लाडका 'भाईजान' असलेल्या सलमान खानच्या या संतापाची चर्चा थेट पाकिस्तानपर्यंत जाऊन पोहोचली. ज्याप्रमाणे सलमानचे चाहते त्याच्या प्रत्येक लूकवर, अगदी त्याच्या रागावरही प्रेम करतात, त्याचप्रमाणे लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानही सलमानच्या या 'बिनधास्त' पोस्टवर फिदा झाली आहे. 

सलमान खानच्या रागावर काय म्हणाली माहिरा खान? (Mahira Khan On Salman Khan)

मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री सलमान खान रुग्णालयात जात असताना पॅपाराझींनी त्यांचा पाठलाग केल्याचा प्रकार घडला. रुग्णालयाबाहेर सलमान खानला मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये कैद करण्यासाठी गर्दी झाल्यानं त्यांचा संताप अनावर झाल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलं. या घटनेनंतर सलमान खान यानं सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त करत काही पोस्ट शेअर केल्या.

एका पोस्टमध्ये त्यानं लिहिलं की, "मी 60 वर्षांचा झालो असलो तरी लढायला विसरलो नाही, हे लक्षात ठेवा...", तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यानं संतप्त स्वरात, "तुमच्या कुटुंबातील कोणी रुग्णालयात असेल तर मी अशाच प्रकारे वागू का??" असा सवाल उपस्थित केला. त्याच्या या पोस्ट्सनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.

दरम्यान, माहिरा खान हिनंही सलमान खान याच्या या पोस्ट्स आणि संतापावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं फक्त "यार सल्लू...", अशी प्रतिक्रिया देत सलमान यांना पाठिंबा दर्शवल्याचं म्हटलं जात आहे. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुग्णालयाबाहेर पॅपाराझींवर भडकलेल्या सलमान यांचा व्हिडीओही तिनं शेअर केला होता. माहिराच्या या प्रतिक्रियेचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सलमान खानसोबत करायचंय काम (Mahira Khan Reaction On Salman Khan)

माहिरा खान आणि सलमान खान यांच्याबाबतची एक जुनी आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. जवळपास दशकभरापूर्वी, 2016 मध्ये सलमान खान याचा 'बजरंगी भाईजान' आणि माहिरा खानचा 'बिन रोए' हे सिनेमे एकाच काळात प्रदर्शित होणार होते. त्या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत माहिरानं सलमान खानच्या सिनेमाशी स्पर्धा करण्याचा प्रश्नच नसल्याचं स्पष्ट केलं होतं. "आमचा सिनेमा सलमान खानच्या सिनेमापुढे खूपच लहान आहे. अनेक अडथळ्यांनंतर तो प्रदर्शित होतोय, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे...", असं ती म्हणाली होती.

याच मुलाखतीत माहिरा खान हिनं सलमानबद्दलचं आपलं प्रेमही व्यक्त केलं होतं. ती स्वतःला सलमानची मोठी चाहती मानत असून, 'मैने प्यार किया'पासून त्याचे जवळपास सर्व सिनेमे पाहिल्याचं तिनं सांगितलं होतं. "सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली तर मी ती कधीच सोडणार नाही. फक्त कथा आणि भूमिका चांगली असायला हवी...", असंही तिनं नमूद केलं होतं.

त्या काळात माहिरा शाहरुख खानसोबत 'रईस' सिनेमात काम करत होती आणि पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीतही सक्रिय होते. मात्र, 2016 मधील उरी हल्लानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या कामावर निर्बंध आले. त्यामुळे सलमान आणि माहिरा यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्णच राहिली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan Warns Paparazzi: मध्यरात्री 3 वाजता रुग्णालयापर्यंत पाठलाग, पॅपाराझींचा घोळका दिसताच सलमान खान प्रचंड चिडला, म्हणाला, 'साठीचा झालोय पण आजही 100 जणांना लोळवेन'