Salman Khan: बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान (Salman Khan) आज 60 वर्षांचा झालाय. पनवेलच्या फार्म हाऊसवर अनेक बड्या सेलिब्रेटी मित्रांच्या आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सलमान आपला वाढदिवस करत असल्याची चर्चा असतानाच सलमान खान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडलाय. पान मसाल्याच्या जाहिरात (Pan Masala Ad) वादावरून राजस्थानमधील कोटा येथील ग्राहक न्यायालयाने त्याला थेट हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण एका पान मसाल्याच्या जाहिरातीशी संबंधित असून, आता त्यात बनावट स्वाक्षरीचा आरोप झाल्याने वाद आणखी चिघळला आहे. 

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय? 

कोटा ग्राहक न्यायालयात सुरू असलेलं हे प्रकरण ‘राजश्री पान मसाला’ या ब्रँडच्या जाहिरातीभोवती फिरतंय. या जाहिरातीत ‘वेलची आणि केशर’ असल्याचा दावा करण्यात आल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. या प्रकरणात सलमान खान ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने त्याच्यावरही जबाबदारी येते, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

या वादाला नवं वळण मिळालं ते खोट्या स्वाक्षरीच्या आरोपामुळे. 9 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत तक्रारदार व राजस्थान उच्च न्यायालयातील वकील इंद्र मोहन सिंह यांनी दावा केला की, न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नी आणि सलमानकडून दाखल उत्तरावरील सही ही सलमान खानची नाही. त्यांच्या मते, जोधपूर कारागृह आणि इतर न्यायालयांत उपलब्ध असलेल्या सलमानच्या मूळ स्वाक्षऱ्या आणि कोटा न्यायालयात सादर कागदपत्रांवरील स्वाक्षरी यात मोठा फरक आहे.

Continues below advertisement

सलमान खानला कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश 

या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. सहींची फॉरेन्सिक तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ग्राहकांची दिशाभूल होण्याचा संशय असल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, पान मसाला जाहिरातीवरूनही सवाल उपस्थित होत आहेत. तक्रारदाराने असा मुद्दा मांडला आहे की, बाजारात केशराची किंमत लाखोंमध्ये असताना अवघ्या पाच रुपयांच्या पाऊचमध्ये केशर असल्याचा दावा कसा केला जाऊ शकतो? अशा जाहिराती तरुणांना चुकीचा संदेश देतात, असंही तक्रारीत म्हटलं आहे.

या प्रकरणात केवळ सलमान खानच नव्हे, तर संबंधित कागदपत्रांचे नोटरीकरण करणारे वकील आर. सी. चौबे यांनाही न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता सर्वांच्या नजरा 20 जानेवारीच्या सुनावणीवर आहेत. FSL अहवालात नेमकं काय समोर येतं, यावर सलमान खानच्या अडचणी वाढतात की कमी होतात, हे ठरणार आहे. दरम्यान,वाढदिवसाच्या दिवशी भाईजानची ही ‘कोर्टरूम स्टोरी’ बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.