Salim Khan Discharged from Hospital After Month: बॉलिवूडचे भाईजान सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्या आरोग्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. तब्बल एक महिन्यांनंतर लीलावती रुग्णालयातून सलीम खान यांना डिस्चार्च देण्यात आला आहे. ते सुखरुप आपल्या वांद्रे येथील घरी पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना 17 मार्च रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे. सलमान खान सकाळी 6 वाजता रुग्णालयात पोहोचला होता. त्यानं डिस्चार्चची सगळी फॉर्मेलिटी पूर्ण केली. नंतर सलीम खान यांना डिस्चार्च देण्यात आला आहे. माहितीनुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्ट्सनुसार, 17 मार्च रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान, सलमान खान लीलावती रुग्णालयात पोहोचला. 10:30 च्या दरम्यान सलीम खान यांना रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आले. यावेळी सलमान व्यतिरिक्त कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. सलीम खान यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधार झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना आज डिस्चार्च देण्याची परवानगी देण्यात आली.
17 फेब्रुवारी रोजी सलीम खान यांची अचानक तब्येत बिघडली. यानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, जलील पारकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सलीम यांना माइनर ब्रेन हॅमरेज झाला होता. यावर त्वरीत उपचार करण्यात आले. सलीम खान यांना व्हेंटिलेटरवर उपचारासाठी ठेवण्यात आले होते.
जलील पारकर यांनी सांगितलं की, सलीम खान यांना इमरजेंसीमध्ये आणण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते. सलीम खान यांच्यावर उपचार सुरु असताना कुटुंबाने तातडीने लीलावती रुग्णालयात धाव घेतली. तसेच काही बॉलिवूड कलाकार आणि मित्र परिवाराने त्यांची भेट घेण्यासाठी लीलावती रुग्णालय गाठले.
कुटुंबाव्यतिरिक्त सलीम खान यांचे मित्र जावेद अख्तर त्यांच्या भेटीला दररोज जात होते. तसेच आमिर खान, डेजी शाह, रितेश देशमुख, शाहरुख खान, संजय दत्त आणि संगीता बिजलानीसह अनेक सेलिब्रिटींनी रुग्णालयात जाऊन सलीम खान यांची भेट घेतली.
