Salim Khan admitted to ICU at Lilavati Hospital Mumbai: भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर लेखक सलीम खान यांची प्रकृती अत्यंत बिकट झाली आहे. त्यांना सकाळी तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सलीम खान यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर नेमकं कोणत्या आजारावर उपचार सुरु आहेत? त्यांची प्रकृती नेमकी कोणत्या कारणामुळे खालावली? याची माहिती समोर अद्याप समोर आलेली नाही. सकाळी अभिनेता सलमान खान तातडीने वडिलांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता. तो सकाळी रुग्णालयाबाहेर स्पॉट झाला होता. नंतर खान कुटुंबातील सर्वांनी रुग्णालयात जाऊन सलीम खान यांची भेट घेतली.
दरम्यान, सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली. सलीम खान यांचे डॉक्टर जलील पारकर यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटलं की, 'सलीम खान यांना सकाळी 8:30 वाजता डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखेखाली लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे फॅमिली डॉक्टर संदीप चोपडा यांनी त्यांना इमरजेंसीमध्ये आणले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु झाले. डॉ. सलीम खान यांना पहिल्या मजल्यावर अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. डॉ. विनय चव्हाण, डॉ. अजीत मेनन, डॉ. नितिन डांगे, डॉ. बिनीत अहलूवालिया या डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरु आहेत.
कुटुंबांच्या विनंतीचा आदर करून, आज कोणतीही अधिक माहिती शेअर केली जात नाही. उद्या सकाळी 11 वाजता, आम्ही कुटुंबाच्या समंतीने आणि रुग्णाची संपूर्ण गोपनीयता राखून एक प्रेस बुलेटिन जारी करु.. ते सध्या स्थिर आहेत. त्यांच्या क्लिनिकल स्टेटसचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे', असं त्यात नमूद करण्यात आले आहे.
सलीम खान यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना रुग्णालयात भर्ती करताच खान कुटुंबाने तातडीने रुग्णालयात धाव घेतली. सलीम खान यांची पहिली आणि दुसरी पत्नी, सलमा खान आणि हेलन यांनी रुग्णालयात धाव घेतली. दोघींनीही सलीम खान यांची भेट घेतली. तसेच बॉलिवूडमधील इतर कलाकारांनीही लेखक सलीम खान यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली.
