Shubhangi Gokhale :  दिवगंत ज्येष्ठ अभिनेते मोहन गोखले (Mohan Gokhale) यांनी त्यांची मुलगी सखी (Sakhi Gokhale) ही अगदी सहा वर्षांची असतानाच या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांनी सखीचा एकट्याने सांभाळ केला. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून सखी घराघरात पोहचली. त्यानंतर अमर फोटो स्टुडिओ यांसारख्या नाटकांमधून सखीने रंगभूमीवरही तिची छाप पाडली. अनेकदा सखी तिच्या सोशल मीडियावरुन तर कधी मुलाखतींमधून वडिलांविषयीच्या भावना व्यक्त करत असते. 


नुकतच सखी गोखले आणि शुभांगी गोखले यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोहन गोखले यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. यावेळी सखीने व्यक्त केलेल्या तिच्या भावना व्यक्त केला आहे. मी खूप नशिबान आहे की माझा बाबा लवकर गेला, कारण तोपर्यंत त्याच्या जास्त अशा आठवणी तयारच झाल्या नव्हत्या. तसेच यावर शुभांगी गोखले यांनी देखील मोहन आज असता तर तिला अनेक गोष्टींचं ज्ञान सहज मिळालं असतं, असं म्हटलं. 


तिला मोहनच्या नजरेतून जग पाहायला मिळायला हवं होतं - शुभांगी गोखले


मला असं कायम वाटतं की मोहनच्या नजरेतून जग पाहायला मिळायलं हवं होतं. मी तिला फिरवतेच पण परदेश वाऱ्या तिला मोहनच्या नजरेतून करायला मिळायला हवं होतं. ते मिस होतंय. यावेळी शुभांगी गोखले यांनी एक किस्सा देखील सांगितला. 'सखी खूप लहान होती, तेव्हा आम्ही शेवटचा एकत्र प्रवास केला. आम्ही मद्रासला जात होतो. तेव्हा मुंबई सोडल्यावर तिने दीड दोन तासांतच सुरुवात केली बाबा मदरास कधी येणार. सारखं तिने हा सूर लावला होता. शेवटी एका स्टेशनला तो उतरला. बाबा बाहेर गेला, आला नाही असा गोंधळ तिने सुरु केला. त्यानंतर तो दुसऱ्या बोगीतून चालत आला. तो आला आणि दोन मोठे नकाशे बूक स्टॉलवरुन आणले आणि तिच्याजवळ फेकले. मग ते तिच्यासमोर उघडले आणि तिला सांगायला लागला. की आपण कसं मुंबईतून निघालो मग कर्नाटक क्रॉस करणार मग कोणतं गावं येणार, किती वाजता येणार.मग त्यामध्ये ती रमली. आता मीही तिला घेऊन फिरलेय, पण आज मोहन असता तर त्याला आणखी जोड मिळाली असती, असं शुभांगी गोखले यांनी म्हटलं. 


बाबा आता असता तर खरंच मज्जा आली असती - सखी गोखले


जशी मी मोठी होतेय, तसं माझ्या लक्षात येतंय की, माझ्या आणि बाबाच्या आवडी खूप सारख्या आहेत. माझ्या घरात खूप मोठा बूक शेल्फ आहे. त्यामध्ये बाबाची आणि  आईची खूप पुस्तकं आहेत. त्यातली बरीचशी इंग्रजी पुस्तकं ही बाबाची आहेत. अजूनही मला त्यात नवीन नवीन काहीतरी सापडत राहतं. त्यादिवशी मला एक पुस्तक सापडलं तिथे, तेव्हा माझं असं झालं की अरे मला हेच पुस्तक वाचायचं होतं. तेव्हा मी आईला म्हटलं की,आता खरंतर बाबा असता खूप मज्जा आली असती.कारण मी आता आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहे, तिथे माझ्या गाण्याच्या आवडी, वाचनाच्या आवडी, मला ज्या गप्पा मारायला आवडतात, हे त्याच्यासारखं आहे. त्यामुळे तो आता असता तर खरंच खूप मज्जा आली असती आणि ती मैत्री आमच्यात झाली असती, असं सखीने म्हटलं. 


ही बातमी वाचा :


Sakhi Gokhale : 'मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला, क्रूर वाटेल पण...'; सखी गोखलेने व्यक्त केल्या वडिलांविषयीच्या भावना