Sakharam Binder Coming Back To Theater: मराठीतील प्रसिद्ध नाटककार (Famous Marathi Playwrights) विजय तेंडुलकरांचं (Vijay Tendulkar) 'सखाराम बाइंडर' (Sakharam Binder) हे नाटक म्हणजे, अभिजात कलाकृती. 1972 साली प्रदर्शित झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू आजही पहायला मिळते म्हणूनच आजही या नाटकाला हात घालण्याची अनेक रंगकर्मीची इच्छा होते. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच शिवाय, मराठी मध्येही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे पुनः पुन्हा लोकांसमोर सादर केलं गेलं. 'सखाराम बाइंडर' हे रंगभूमीवरचं एक वादळी पर्व आता पुन्हा रंगमंचावर गाजणार आहे.
स्त्री-पुरूष संबंधांचं करकरीत वास्तव मांडत समाजाला धक्का देणारे, विख्यात नाटटकार विजय तेंडुलकरांचे 'सखाराम बाइंडर' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असून विशेष म्हणजे, तितक्याच ताकदीचे कसलेले गुणवान सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे या नाटकातील सखाराम ही भूमिका करणार आहेत. सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे इथे या नाटकाचं पोस्टर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज च्या सहकार्यानं हे नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे. या निर्मिती संस्थेचं हे तिसरं नाट्यपुष्प आहे.
हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे असं सांगत, रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची भावना सयाजी शिंदे यांनी बोलून दाखवली. आजच्या पिढीनं हे नाटक पाहिलेलं नाही या पिढीलाही हे नाटक या निमित्तानं जाणून घेता येणार आहे.
या नाटकाच्या नव्या संचाबद्दल बोलताना दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव सांगतात की, "एक अभिजात कलाकृती पुन्हा रसिकांसमोर सादर करणे आमच्यासाठी एक जबाबदारीच आहे. तेंडुलकरांच्या लेखनाला कुठेही धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन नव्या संचात हे नाटक करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आजच्या पिढीला विजय तेंडुलकरांची श्रेष्ठता समजावी यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् या निर्मिती संस्थेचं रंगभूमीसाठी हे महत्त्वाचं योगदान ठरेल. उत्तमप्रकारे त्यांनी निर्मितीची बाजू हाताळली आहे. आजच्या पिढीसाठी हे नाटक आणताना नाटककार विजय तेंडुलकरांचे नेमकं म्हणणं काय होतं? हे सांगताना सगळ्या शक्यतांचा विचार करून त्या म्हणण्याच्या जवळ जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. याची जी दिग्दर्शकीय शैली आहे ती लोकाभिमुख आहे. सर्वानुमते विचार घेऊन आम्ही हे नाटक सादर करत आहोत. सयाजी शिंदे यांच्या सोबत नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे, अभिजीत झुंजारराव हे कलाकार या नाटकात आहेत.
दरम्यान, या नाटकाचे निर्माते मनोहर जगताप तर कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे. नेपथ्य सुमीत पाटील तर प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. रंगभूषा शरद सावंत तर वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे. सहाय्यक संकेत गुरव आहेत.