Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसून एका चोरट्यानं चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करुन त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अशातच 30 तास उलटून गेल्यानंतरही अजून पोलीस सैफच्या आरोपीला पकडू शकलेले नाहीत. अशातच पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. पण, चौकशीनंतर हा तो आरोपी नसल्याचं सिद्ध झालं आहे. पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ज्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं, तो आरोपी नाही." त्यामुळे आता अजूनही आरोपीचा शोध सुरू आहे.
सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करून पळ काढणारा आरोपी फरार आहे. पोलिसांची तब्बल 20 पथकं गेल्या 30 तासांहून अधिक काळापासून त्याचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही आरोपीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली आहे. अशातच पोलिसांच्या हाती नवी माहिती लागली आहे, त्या दृष्टीनं पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. सैफ अली खानचा हल्लेखोर नालासोपारा -विरारच्या दिशेनं निघाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोर कोणत्या मार्गानं प्रवास करत आहेत, त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून वेगानं प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीनं मुंबईतून पळ काढून नालासोपारा -विरारच्या दिशेनं आपला मार्गक्रमण केलं आहे. या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीनं नालासोपारा-विरार परिसरातील सर्व रेल्वे स्थानकं, बसस्थानकं, तसेच मुख्य रस्त्यांवर पाहणी करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांकडून कोणतीही मदत मागितली नाही.
सैफच्या बिल्डिंगमधून पळ काढताना आरोपी CCTV मध्ये कैद
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी CCTV मध्ये कैद झाला. सैफ राहत असलेल्या बिल्डिंगच्या पायऱ्यांवरून सहाव्या मजल्यावरून धावताना हा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर, मध्यरात्री दोन वाजून 33 मिनिटांनी हा आरोपी बिल्डिंगखाली धावत गेला. दरम्यान, या प्रकरणी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैफवरील हल्ल्यात इतरही कोणाचा सहभाग आहे का याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. आरोपी पळून जाताना सहाव्या मजल्यावर लावलेल्या सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. मात्र त्यानंतर इमारतीबाहेर पळताना, किंवा परिसरात लावलेल्या इतर सीसीटीव्हीत तो दिसत नाही. तसंच मुख्य प्रवेशद्वारातूनही बाहेर जाताना तो दिसत नाही आहे. त्यामुळे या हल्ल्यात इतरही कोणाचा सहभाग आहे का असा सवाल उपस्थित होतोय. सहाव्या मजल्यावर लावलेला सीसीटीव्ही एका रहिवाशानं लावला आहे.
दरम्यान, आरोपीला या इमारत परिसराची संपूर्ण माहिती होती असा पोलिसांचा कयास आहे. तो थेट सैफच्या मजल्यावर कसा पोहोचला. इतर कोणत्या मजल्यावर कसा गेला नाही याचा शोध सुरू आहे. त्यासाठी पोलिसांनी सैफकडे फ्लोअर पॉलिशिंग करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली आहे.