Saie Tamhankar On Prajakta Mali Cannes Look: यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) मराठी रसिक-प्रेक्षकांसाठी काहीसा खास ठरला. यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर (Cannes Red Carpet) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf), त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) उरलेली. यामध्ये तिनही मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) कलाकारांच्या लूकनं साऱ्यांचं लक्ष वेधलं. त्यातल्या त्यात प्राजक्ता माळीच्या लूकनं तर तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवला.
प्राजक्ता माळीनं कान्ससाठी केलेला खास मराठमोळा लूक (Prajakta Mali Marathi Look) चाहत्यांना खूप आवडला. तर, ती ज्या पद्धतीनं मराठमोळ्या साजात कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवली, ते पाहून तर सारेच अचंबित झाले. अनेकांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिचं कौतुक केलं. पण, काहींना प्राजक्ताचा लूक काहीसा खटकला. अनेकांनी तिला ट्रोलही केलं. तसेच, तिनं मराठमोळा साज करुन अंगप्रदर्शन केलं, असंही म्हटलं. अशातच आता प्राजक्ताच्या लूकवर मराठीतील वर्सटाईल अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं प्रतिक्रिया दिली आहे.
'महाराष्ट्र टाईम्स'च्या 'मुंबई टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सई ताम्हणकरनं प्राजक्ता माळीचं कौतुक केलं. तसेच, प्राजक्ताचा अभिमान वाटत असल्याचंही तिनं स्पष्ट केलं. मला वाटतं कोणी काय परिधान करावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असंही सई ताम्हणकर म्हणाली आहे.
प्राजक्ता माळीच्या लूकवर बोलताना सई ताम्हणकर नेमकं काय म्हणाली?
अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली की, "प्राजक्ताने ज्या आत्मविश्वासाने, ज्या ग्रेसने 'कान'च्या रेड कार्पेटवर स्वत:ला कॅरी केलं ते मला खूप आवडलं. काही जणांना ते झोंबलं जरी असलं तरी ते एका अर्थी चांगलंच झालं. कारण याचा अर्थ तिच्याकडे बऱ्याच जणांचं लक्ष होतं. मला वाटतं कोणी काय परिधान करावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काहीही झालं तरी लोक बोलणारच आहेत. तुम्ही गेलात काय आणि नाही गेलात काय, चर्चा होणारच आहे. आपण का उगाच तक्रारी करायच्या? त्यापेक्षा ते क्षण साजरे करा ना..."
"मी कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी कधी गेलेच, तर मला माझ्या एखाद्या सिनेमाच्या सादरीकरणासाठी 'कान्स'ला जायला आवडेल. तसंच वेगवेगळ्या स्टाईलचे पेहराव करणं, त्यात प्रयोगशील असणं हा आमच्या कामाचाच भाग असतो. मला जितकं माझं काम आवडतं तितकंच मी फोटोशूटही एन्जॉय करते. कोणाला ते आवडतं तर कोणाला ते खर्चिकही वाटतं. मला मात्र असे प्रयोग करण्याची भीती वाटत नाही. हेच माझ्या कामात, फोटोशूट आणि स्टाईलमध्ये उतरतं आणि उठूनही दिसतं...", असं सई ताम्हणकर म्हणाली.
दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती लवकरच 'तुंबाडची मंजुळा' या मराठी सिनेमात दिसणार आहे. तर, यापूर्वी सई ताम्हणकर 'मटका किंग' सीरिजमध्ये दिसलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP माझाच्या बातम्या LIVE...
