Sai Tamhankar on Sameer Chougule : अभिनेत्री सई ताम्हणकरने अभिनेता समीर चौगुलेचं तोंड भरुन कौतुक केलंय. सईचा 1 मे रोजी गुलकंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या निमित्ताने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सईने समीरचा स्वभाव कसा आहे? याबाबत भाष्य केलंय. सई ताम्हणकर म्हणाली, सॅमीवर आम्ही सर्वजण एवढचं प्रेम करतो. मी एकटी नाही, ईशाला जर हा प्रश्न विचारला तरीही तिचं उत्तर हेच असेल. मला वाटतं समीर त्याच्या कॅरेक्टर सारखा आहे. एकदम साधा, पाण्यासारखा आहे. गोड आणि निष्पाप आहे.
‘गुलकंद’ हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून 1 मे रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ ट्रेलरमध्ये दिसून येतो. ढवळे-माने कुटुंबांच्या संसारात मुरलेला ‘गुलकंद’ प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल, याची खात्री आहे. चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे.
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, "आम्ही नेहमीच वेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्रपट निर्मितीवर भर दिला आहे. गुलकंदाचे किमान १० आरोग्यदायी फायदे असतात, पण हा चित्रपट 11 व्या आणि सर्वात महत्वाच्या फायद्याबद्दल आहे तो म्हणजे आनंद! गुलकंदाप्रमाणेच गोड, सुगंधित व आरोग्यदायी असलेला हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक भावनेचा गोडवा मांडतो. हा चित्रपट जितका गोड आणि भावनिक आहे तितकाच प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ही आहे. सर्व तगड्या कलाकारांनी या चित्रपटाला एक वेगळीच उंची दिली आहे. टिझरमध्ये दाखवलेल्या दोन कपल्सच्या वेगळ्या नात्यांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल. काही खट्याळ प्रसंगासोबतच प्रेमाची नाजूक झलकही प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. विनोदाने भरलेला हा कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने नक्कीच एकत्रित पाहावा."
दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात, “नातं जेव्हा एकसुरी होतं, तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं, आणि हाच गोडवा ‘गुलकंद’ चित्रपटात आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल. आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केले, पण या चित्रपटात भावना, नाती, प्रेम आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे. एव्हरेस्टचे संजय छाब्रिया या कुटुंबाचा भाग झाले, हे आमचं भाग्य. ही टीम एकमेकांना ओळखते, त्यामुळे ‘गिव्ह अँड टेक’ अप्रतिम झाला आहे. हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल.”
इतर महत्त्वाच्या बातम्या