Sai Baba Fame Sudhir Dalvi Health Critical: टीव्ही (TV Industry) आणि सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) सध्या आरोग्याच्या गंभीर समस्येशी झुंज देत आहेत. 'रामायण' मालिकेतील (Ramayana serial) 'गुरु वशिष्ठ' आणि 1977 मधील 'शिर्डी के साई बाबा' (Shirdi Ke Sai Baba) सिनेमातील 'साई बाबा' (Sai Baba Fame Actor) यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे घराघरांत पोहोचलेले हे 86 वर्षीय अभिनेते आता हळूहळू बरे होत असून, रुग्णालयातून घरी परतले आहेत. तरीही, त्यांची प्रकृती अजून पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. ते 'वॉकर'च्या साहाय्यानं चालतात आणि त्यांची मानसिक स्थितीही अजून पूर्णपणे स्थिर झालेली नाही.
सुधीर दळवी यांना 7 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. ते 'सेप्सिस'मुळे (Sepsis) उद्भवलेल्या प्रकृतीच्या अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या गुंतागुंतीशी लढा देत होते. 'सेप्सिस' हा एक गंभीर संसर्ग आहे, जो शरीरात वेगानं पसरू शकतो आणि जीवाला धोका निर्माण करू शकतो.
महिनाभर रुग्णालयात, ICU मध्ये ठेवण्याची ओढवली वेळ
सुधीर दळवी यांच्या आजाराचा परिणाम त्यांच्या सांध्यांवर झाला, ज्यामुळे त्यांना हालचाल करणंही अत्यंत कठीण झालं. प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. ते साधारणपणे एक महिना रुग्णालयात होते. दीर्घकाळ चाललेल्या या उपचारांसोबतच वैद्यकीय खर्चाचा बोजाही वाढत गेला.
मीडिया रिपोर्टनुसार, रुग्णालयाचं बिल सुरुवातीला 10 लाख रुपयांच्या वर गेलं आणि कालांतरानं ते 19 लाख रुपयांपेक्षा जास्त झालं. उपचारांचा खर्च आणखी वाढू शकतो, असा अंदाजही डॉक्टरांनी वर्तवला होता. या कठीण काळात, उपचार सुरू ठेवणं आणि त्याच वेळी रुग्णालयाच्या प्रचंड खर्चाचा भार पेलणं, अशा दुहेरी आव्हानाचा सामना त्यांच्या कुटुंबाला करावा लागला.
अक्षय कुमार, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यनचा मदतीसाठी पुढाकार
जेव्हा सुधीर दळवी यांच्या कुटुंबाला रुग्णालयाची वाढती बिलं भरताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या बातम्या समोर आल्या, तेव्हा सिनेसृष्टीतील अनेक लोक मदतीसाठी पुढे आले. अलीकडील एका संभाषणात, सुधीर दळवी यांच्या पत्नी सुहास दळवी यांनी सांगितलं की, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार हे मदतीचा हात पुढे करणाऱ्यांमध्ये सर्वात आधी होते. दरम्यान, त्यांनी हेसुद्धा नमूद केलं की, सिनेसृष्टीबाहेरील अनेक लोकांकडूनही आर्थिक मदत मिळाली. सुहास यांनी सांगितलं की, जरी त्यांना सर्वांची नावं त्वरित आठवत नसली, तरी या अभिनेत्यांनी कठीण काळात कुटुंबाला भक्कम साथ दिलीय.
साई बाबांच्या भूमिकेमुळे जनतेशी घट्ट नातं
सुधीर दळवी यांना साई बाबांच्या भूमिकेमुळे सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. 1977 मधील 'शिर्डी के साई बाबा' सिनेमातील त्यांची भूमिका इतकी अविस्मरणीय होती की, लोकांच्या मनात त्यांनी साईबाबा म्हणून कायमचं आणि हक्काचं स्थान मिळवलं.
सुधीर दळवी यांच्या पत्नी सुहास दळवी यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांच्या आजारपणाची बातमी सार्वजनिक झाली, तेव्हा साई भक्तांचीही मोठ्या संख्येनं मदत मिळाली. त्या म्हणाल्या, "जेव्हा ही बातमी पसरली की, आता आम्हाला रुग्णालयाची बिलं भरणं अशक्य होत चाललंय, तेव्हा सिनेसृष्टीतील अनेक लोक आर्थिक मदतीसाठी पुढे आले. मला सर्वांची नावं लगेच आठवत नाहीत, पण कार्तिक आर्यन, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार हे मदतीसाठी सर्वात आधी पुढे आलेल्यांपैकी होते. सिनेसृष्टीतील आणि त्याबाहेरील अनेक लोकांनी मदत केली. माझे पती साई बाबांची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात आणि अनेक साई भक्तांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला..."
कृतज्ञता व्यक्त करताना सुधीर यांची पत्नी म्हणाली की, "आपण निर्दयी झालो आहोत असं कोण म्हणतं? माझ्या पतीच्या आजारपणात लोकांनी जे प्रेम आणि औदार्य दाखवलंय, त्यामुळे मी भारावून गेलोय..."
साईबाबा ट्रस्टकडून 11 लाखांची मदत
सुधीर दळवी यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मदत करण्यासाठी 'श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट'नेही पुढाकार घेतला. डिसेंबर 2025 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयानं ट्रस्टला त्यांच्या उपचारांचा खर्च भागवण्यासाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी दिली. परिणामी, सिनेसृष्टी, साईभक्त आणि इतरांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे या अभिनेत्याचे उपचार सुरू राहू शकले. सुधीर दळवी आता रुग्णालयातून घरी परतले आहेत, मात्र त्यांची प्रकृती सुधारण्याचा वेग अद्याप मंद आहे. त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, "ते आता घरी आहेत. हालचाल करण्यासाठी त्यांना अजूनही 'वॉकर'ची गरज भासते आणि त्यांची मानसिक स्थिती अजूनही काहीशी गोंधळलेली असते. तरीही, घरी परतल्याचा त्यांना आनंद आहे आणि मलाही..."
