Sadak movie Fame Pooja Bhatt : दिग्दर्शित महेश भट्ट यांचा 'सडक' हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री पूजा भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ही एक प्रेमकथा असली, तरी यात सामाजिक वास्तवाचं, लैंगिक शोषणाचं, मानसिक संघर्षाचं आणि मानवी भावनांचं प्रभावी चित्रण करण्यात आलं होतं. ‘सडक’ हा सिनेमा केवळ एका प्रेमकथेपुरता मर्यादित न राहता, त्याने अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य केलं आहे.
या सिनेमाची कथा रवी (संजय दत्त) या टॅक्सी ड्रायव्हरभोवती फिरते, जो मानसिकदृष्ट्या खचलेला असतो, कारण त्याच्या लहान भावाने आत्महत्या केलेली असते. रवीने आयुष्यात जे दुःख अनुभवले आहे, त्याचे सावट त्याच्या वागणुकीत दिसते. तो एका वेश्येवर, पूजा (पूजा भट्ट) वर प्रेम करतो आणि तिची मुक्तता करण्याचा निर्णय घेतो. पण पूजा एका क्रूर आणि बलाढ्य किन्नर माफिया – महारानी (सदाशिव अमरापूरकर) यांच्या जाळ्यात अडकलेली असते. रवी आणि पूजाचा संघर्ष फक्त समाजाच्या विरोधात नाही, तर त्यांच्या स्वतःच्या दुःखाशीही आहे.
महेश भट्ट यांचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अभिनेत्री पूजा भट्टला या सिनेमातून वेगळी ओळख मिळाली होती. मात्र, पूजा भट्ट सध्या काय करते? कशी दिसते? याबाबत जाणून घेऊयात...
पूजा भट्ट अलीकडेच बिग बॉस ओटीटी 2 मध्ये झळकली होती, ती तिच्या धाडसी आणि पारंपरिक चौकटीबाहेरील स्टोरीसाठी ओळखली जाते. तिने केवळ वयाच्या 17 व्या वर्षी म्हणजे 1989 मध्ये डॅडी या चित्रपटातून महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळात, अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून तिने आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे. तिच्या कारकिर्दीत दिल है कि मानता नहीं (1991), जुनून (1992), नाराज़ (1994), आणि चाहत (1996) यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. काही काळ अभिनयापासून दूर राहिल्यानंतर, तिने सडक २ (2020) आणि बॉम्बे बेगम्स (2021) या नेटफ्लिक्स मालिकेतून पुनरागमन केले.पूजा भट्ट एका नव्या साप्ताहिक पॉडकास्टमध्ये बोलताना दिसली होती. तिने पूजा भट्ट शो नावाच्या नवा टॉक शो देखील सुरु केला होता.
‘सडक’ची सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे सदाशिव अमरापूरकर यांचा महारानी या नकारात्मक भूमिकेतील अभिनय. त्यांचा चेहरा, आवाज, देहबोली आणि क्रूरता – सगळं काही प्रेक्षकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. त्यासाठी त्यांना 'फिल्मफेअर'चा सर्वोत्तम खलनायकाचा पुरस्कारही मिळाला. त्यांची ही भूमिका एकेकाळी समाजात चालत असलेल्या ट्रॅफिकिंग आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर समस्यांना प्रामाणिकपणे समोर आणते.
संजय दत्तने रवीची भूमिका अतिशय जिवंत केली आहे. त्याचे डोळे, चेहरा, आणि अभिनय – सगळं एका त्रस्त पण लढणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब होतं. पूजा भट्टचं सौंदर्य, भावनिकता आणि ठाम भूमिका देखील प्रेक्षकांना भावली. या सिनेमाची गाणीही आजतागायत लोकप्रिय आहेत – "तुम्हे अपना बनाने की कसम खाई है", "हम तेरे बिन अब रह नहीं सकते" यांसारखी गाणी आजही प्रेमी युगलांच्या मनात स्थान ठेवतात.
सडक हा सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो एका काळाच्या सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारा आरसा होता. तो प्रेम, संघर्ष, अन्यायाविरुद्ध बंड आणि मानसिक आरोग्य यांचा संगम होता. म्हणूनच आजही ‘सडक’ हा सिनेमा लोकांच्या आठवणीत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
