Marathi Actors in Politics : लोकसभा निवडणुका 2024 (Lok Sabha Election 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षाची लगबग सध्या सुरु आहे. आपला तगडा उमेदवार मतदारसंघात पाठवण्यासाठी प्रत्येक पक्षाची जोमाने चाचपणी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.  अनेक मोठे नेते लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. यामध्ये कलाकार मंडळीही कुठे मागे राहिले नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता शिंदे गटाकडून (Shinde Group) मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा (Mumbai North-West Lok Sabha Constituency) मतदारसंघासाठी काही अभिनेत्यांची चाचपणी सुरु असल्याचं समोर आलं आहे. 


भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये आतापर्यंत हेमा मालिनी, कंगना रणौत, अरुण गोविल या कलाकारांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. त्यातच आता शिंदे गटाकडूनही काही कलाकार मंडळींना लोकसभेचं तिकीट देण्यावर विचारविनिमय सुरु असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या वातावरणात मराठी कलाकार त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीचा मुहूर्त साधणार का याची उत्सुकता सध्या सगळ्यांना लागून राहिली आहे. 


'या' कलाकारांची शिंदे गटाकडून चाचपणी सुरु


सध्या शिंदे गटाकडून अभिनेते शरद पोंक्षे, सचिन खेडेकर, सचिन पिळगांवकर यांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर -पश्चिम या मतदारसंघामध्ये मराठी किंवा अमराठी यापैकी कोणाला जास्त पाठिंबा मिळू शकतो किंवा पसंती मिळू शकते याचा सर्व्हे शिंदे गटाकडून करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. खरंतर वायव्य मुंबईसाठी नुकतच काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या संजय निरुपम यांच्यासाठी चाचपणी सुरु असल्याचंही कळतंय. पण संजय निरुपम हा अमराठी चेहरा असल्याने त्या भागातील भाजपचे स्थानिक नेते म्हणजे मोहित कंबोज असो किंवा इतर यांच्याकडून फारसा कौल मिळत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे शिंदे गटाकडून सावध पवित्रा घेण्यासाठी या मराठमोळ्या कलाकरांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याचंही म्हटलं जात आहे. 


शरद पोंक्षेंचं नाव अग्रस्थानी


दरम्यान अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या हिंदुत्वादाची भूमिका कायम जाहीरपणे मांडत असतात. त्यामुळे या यादीमध्ये शरद पोंक्षेंचं नाव अग्रस्थानी असल्याचं म्हटलं जात आहे. पण वायव्य मुंबईसाठी संजय निरुपम यांची वर्णी लागणार की शरद पोंक्षेंना पक्षाचं तिकीट मिळणार याची देखील उत्सुकता आहे. दरम्यान सचिन पिळगांवकर, सचिन खेडेकर आणि शरद पोंक्षे यांच्याबाबतीत मराठी जनतेचं काय मत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून जर तिकीट मिळालं तर कोणता मराठी कलाकार राजकारणात प्रवेश करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Kavita Lad : रंगभूमीवर शेवटचं वाक्य आहे असं वाटलं, प्रयोगानंतर रडू कोसळलं; कविता लाड यांच्यासोबत काय झालं?