ती बाई जितकी सुंदर होती, त्याच्या 10 पटीने तिचे पाय सुंदर होते, सचिन पिळगावकरांकडून मधुआंटीच्या सौंदर्यांचं वर्णन
Sachin Pilgaonkar on Madhubala : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मधुबालाबाबतचा एक किस्सा सांगितलाय.

Sachin Pilgaonkar on Madhubala : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी पहिल्यांदा आयुष्यात कोणाचा ऑटोग्राफ घेतला? आणि त्यांनी पहिल्यांदा कोणाला ऑटोग्राफ दिला? याबाबतचे दोन किस्से सांगितले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांच्याबाबतच्या आठवणी सांगितल्या आहेत. सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) काय काय म्हणाले? आपण जाणून घेऊयात..
सचिन पिळगावकर यांनी सांगितले, "माझा आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ एक व्यक्तीने घेतला होता, आणि तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. त्या काळात विशू राजे, जे माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांना 'हा माझा मार्ग एकला' हा चित्रपट हिंदीत बनवायचा होता. तेव्हा मी अंदाजे 14-15 वर्षांचा होतो. त्यांना तो चित्रपट संजीव कुमार यांच्यासोबत म्हणजेच हरीभाईंबरोबर करायचा होता. त्यासाठी त्यांनी एक खास ट्रायल ठेवली होती, जी अजंथा आर्ट स्टुडिओमध्ये झाली. हरीभाईंनी संपूर्ण चित्रपट तिथे पाहिला. सायंकाळचे सात वाजले होते, चित्रपट पाहून ते बाहेर आले. त्यांनी विशूराजेला विचारले, 'सचिन कुठे राहतो माहिती आहे का?' विशूराजे म्हणाले, 'हो, माहिती आहे'. त्यावर हरीभाईंनी विचारले, 'मला त्याच्याकडे घेऊन जाता का?' लगेच दोघं निघाले. रस्त्यात सांताक्रुझमधल्या एका स्टेशनरी दुकानाजवळ त्यांनी गाडी थांबवली. एक ऑटोग्राफ बुक आणि पेन घेतला. नंतर ते आमच्या घरी आले. बेल वाजवली. वडिलांनी दरवाजा उघडला तर समोर हरीभाई म्हणजेच संजीव कुमार उभे होते. त्यांनी विचारले, 'सचिन आहे का? त्याला बोलवा'.
तेव्हा मी बाहेर आलो. ते म्हणाले, 'मी आत्ताच हा माझा मार्ग एकला पाहून आलोय. मी आयुष्यात कधीच कोणाचा ऑटोग्राफ घेतला नाही. पण मी पहिला ऑटोग्राफ तुझाच घ्यायचा ठरवलं आहे.' असं म्हणत त्यांनी ऑटोग्राफ बुक आणि पेन माझ्यासमोर ठेवलं. मी लिहिलं, ‘हरीभाऊ, विथ लव्ह – सचिन’. हा प्रसंग मी कधीही विसरणार नाही."
पुढे सचिन पिळगावकर म्हणाले, "मी ज्या वेळेस पहिल्यांदा स्वतः कोणाचा ऑटोग्राफ घेतला, तेव्हा मी फार लहान होतो – सुमारे 7 वर्षांचा. माझ्याकडे ऑटोग्राफ बुक नव्हतं, त्यामुळे मी एका अभ्यासाच्या वहीवर ऑटोग्राफ घेतला होता. राजकमल स्टुडिओमध्ये शूटिंग सुरु होतं. मी टॅक्सीने तिथे पोहोचलो. आम्ही त्या अभिनेत्रीबरोबर कधी काम केलं नव्हतं. पण मी त्यांना मधू आंटी (मधुबाला) म्हणून हाक मारली आणि पळालो. तिने माझ्याकडे पाहिलं..आम्ही हात पसरवले..मी गेलो आणि मिठीच मारली. मी म्हटलं, 'मधू आंटी, एक मिनिट थांबा.' मी वही आणि पेन काढलं आणि तिला ऑटोग्राफ मागितला. ती थोडी हसली आणि म्हणाली, 'माझा ऑटोग्राफ तुला हवा आहे?' आणि तिने ऑटोग्राफ दिला. त्या वेळी मी खाली पाहिलं आणि त्यांच्या पायांकडे लक्ष गेलं.मला द्या बाईचे पाय दिसले. ती बाई जितकी सुंदर होती, त्याच्या 10 पटीने त्या बाईचे पाय सुंदर होते. असे पाय मी आयुष्यात कधी बघितले नाहीत. इतके सुंदर तिचे पाय होते. बापरे बाप..त्यानंतर ब्रेकमध्ये त्या माझ्या शूटिंग सेटवर आल्या आणि आम्ही एकत्र बसलो. पण त्या दिवशी मी घेतलेला तो पहिला ऑटोग्राफ, तो माझ्या आठवणीत कायमचा कोरला गेला आहे."
इतर महत्त्वाच्या बातम्या
























