Sachin Goswami Post : शालेय शिक्षणात हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात अनिवार्य केल्याच्या निर्णयावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून अनेक राजकीय पक्षांनीही सरकारच्या या भूमिकेला विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षणात स्थानिक भाषांचा अवमान होत असल्याची भावना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. विशेषतः महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कलाविश्वातील अनेक नामवंतही आता या चर्चेत सक्रिय झाले आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी शोचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावरून पुन्हा एकदा सरकारच्या निर्णयाविरोधात आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वीही त्यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एक पोस्ट शेअर केली होती, त्यावरून निर्माण झालेल्या चर्चेनंतर आता त्यांनी स्पष्टीकरण देणारी दुसरी पोस्ट शेअर करत आपली भूमिका पुन्हा ठामपणे मांडली आहे.
सचिन गोस्वामी यांची सोशल मिडीया पोस्ट
सचिन गोस्वामी यांनी त्यांच्या सोशल मिडीया फेसबुक वरती एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, ''शासनाच्या पहिली पासून हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून अनिवार्य (जरी तिची अनिवार्यता काढून कुठलीही भाषा,पण २० विद्यार्थी जमले तरच असा विचित्र पर्याय देऊन शब्दछल केला असल्याने)करण्याला विरोध आहे..हिंदी भाषा शिकण्याला नाही.''''मुलं थोडी मोठी झाली की ५ वी नंतर शिकवा की हिंदी..आमचा विरोध प्राथमिक शिक्षणात समावेशाला आहे.. सरसकट हिंदी भाषेला नाही. कोवळ्या वयात मुलांना मराठी लिपी,व्याकरण याचा अदमास यायला पुरेसा वेळ मिळावा.मातृ भाषेचा पाया घट्ट व्हावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे..त्याच वेळी इंग्रजी,आणि त्यावर हिंदी अशा भाषांचे ओझे का द्यायचे?''
सचिन गोस्वामी यांनी म्हटलं की, ''मराठी आणि हिंदी लिपी (देवनागरी)सारखी असली .तरी व्याकरण चिन्हे व काही उच्चार वेगळे आहेत..एक भाषा शिकताना दुसऱ्या भाषेतील फरक मुलाना गोंधळात पाडू शकेल. इयत्ता म्हणायची की कक्षा? शिक्षा म्हणजे दंड की शिक्षण?विमान की हवाई जहाज..ससा की खरगोश.. धनुष्य की धनुष..असे असंख्य गोंधळ लहान वयात निर्माण होण्या ऐवजी एका भाषेची सवय होऊ द्या मग नवी भाषा आत्मसात लवकर होईल एव्हडच… उगाच या धोरणाला विरोध म्हणजे हिंदी ला विरोध असा बालिश तर्क काढून याला राजकीय स्वरूप देऊ नका..हा सामाजिक प्रश्न आहे राजकीय नाही.''
राज्यातील अनेक पालक आणि शिक्षकही याच मुद्द्यावरून चिंता व्यक्त करत आहेत. "मराठी मुलांना मराठी, इंग्रजी, आणि आता हिंदीही सक्तीची मग ते इतर विषय कधी आणि कसे शिकणार?" असा सवाल सोशल मीडियावर सातत्याने विचारला जात आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव वाढत चालला आहे. विविध संघटना, शिक्षणतज्ज्ञ आणि मराठी भाषा प्रेमी आता सरकारकडे पुनर्विचाराची मागणी करत आहेत. सध्या तरी हिंदी सक्तीच्या निर्णयावरून विरोधक, नागरिक आणि आता कलाकारदेखील एकत्र येऊन आपला विरोध नोंदवत असल्यामुळे, सरकार पुढे यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.