Rohit Shetty house Bullet Firing: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू येथील घराबाहेर मंगळवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असून, सोशल मीडियावरून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 12.45 वाजण्याच्या सुमारास रोहित शेट्टीच्या घराबाहेर पाच राऊंड फायरिंग करण्यात आली. हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेता हा गुन्हा मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला असून, रोहित शेट्टीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.

Continues below advertisement

बाइकवरून आले, गोळीबार करून पसार

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर बाइकवरून जुहू परिसरात आला. काही अंतरावर बाइक उभी करून त्याने शेट्टी टॉवरच्या पहिल्या मजल्यावर गोळीबार केला. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तो भाग रोहित शेट्टीच्या जिमचा असल्याचे सांगितले जात आहे. गोळीबारानंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बिश्नोई गँगची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘इंडिया टुडे’च्या पोस्टच्या स्क्रीनशॉटनुसार, या पोस्टमध्ये म्हटले आहे की,

Continues below advertisement

“मुंबईत शेट्टी टॉवरमध्ये फिल्म डायरेक्टर रोहित शेट्टी याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही याला अनेकदा मेसेज देऊन आमच्या कामात हस्तक्षेप करू नका, असे सांगितले होते. हा फक्त छोटा ट्रेलर आहे. पुढच्यावेळी घराबाहेर नाही, तर थेट बेडरूममध्ये गोळी चालेल, तीही छातीवर.”

बॉलिवूडला थेट धमकी

याच पोस्टमध्ये पुढे संपूर्ण बॉलिवूडला इशारा देण्यात आला आहे.“वेळीच सुधरून घ्या, नाहीतर बाबा सिद्दीकीसारखी अवस्था होईल. आम्ही ज्यांना फोन केले आहेत, त्यांनी आमच्या मार्गावर यावे, नाहीतर लपण्यासाठी जागा कमी पडेल,” अशी धमकी देण्यात आली आहे.

आधी सलमान खानच्या घरावरही हल्ला

लॉरेन्स बिश्नोई गँग यापूर्वीही सलमान खानच्या मुंबईतील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर गोळीबार प्रकरणात चर्चेत आली होती. 14 एप्रिल 2024 रोजी झालेल्या त्या घटनेनंतर सलमान खानला Y-प्लस सुरक्षा देण्यात आली असून, त्याच्या घरात बुलेटप्रूफ काच बसवण्यात आली आहे. तो सध्या बुलेटप्रूफ वाहनातूनच प्रवास करतो.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर असून, त्याची गँग हत्या, खंडणी, फसवणूक आणि हिंसक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. 1998 च्या काळ्या हरणाच्या शिकारी प्रकरणानंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आले होते. बिश्नोई समाज काळ्या हरणाला पूजनीय मानतो.

रोहित शेट्टीचे अलीकडचे प्रोजेक्ट

रोहित शेट्टीने 2024 मध्ये ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. याच वर्षी त्याने ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली. सध्या त्याच्या आगामी प्रकल्पांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.