Rohit Shetty Gun Firing : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार (Rohit Shetty Gun Firing) झाला आहे. शनिवारी मध्यरात्री रोहितच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणी पोलिसांना चार आरोपींना पुण्यातून अटक केली आहे. गोळीबार करणाऱ्या या चारही आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयात आरोपींची पोलिस कस्टडी पोलिसांकडून मागितली जाणार आहे.
पोलिसांनी या चार आरोपींना आज पुण्यातून अटक केली होती
दरम्यान, पोलिसांनी या चार आरोपींना आज पुण्यातून अटक केली होती. या गोळीबार प्रकरणामागेही लारेन्स बिश्नोई गॅगचा हात असल्याचे बोलले जात आहे. याबाबतीत एक कथित ऑडिओ क्लिपही पोलिसांच्या हाती लागली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
नेमकं घडलं काय?
मुंबईतील जुहू परिसरात आज (1फेब्रुवारी) बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी पाच राउंड गोळीबार केल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. घटना घडली त्यावेळी रोहित शेट्टी घरात होता की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या गोळीबारामागील नेमका हेतू काय होता, हेही अद्याप समोर आलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रोहित शेट्टी यांच्या जुहूतील इमारतीभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात
घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात करण्यात आली असून, सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जात आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते आणि त्यांनी हा हल्ला का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या जुहूतील इमारतीभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, साक्षीदारांची चौकशीही सुरू आहे. पोलीस अधिक तपशील गोळा करत असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, 2024 मध्ये अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेरही अशाच प्रकारची गोळीबाराची घटना घडली होती. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी चार राउंड गोळीबार करून घटनास्थळावरून पलायन केले होते. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर स्वीकारली होती. त्या घटनेनंतर सलमान खान यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. आता रोहित शेट्टीचे घर असलेल्या बिल्डिंगवर नेमकं कोणी हल्ला केला? त्या मागे काय हेतू होता ? याचा माग पोलिस काढत आहेत. परिसरातील सीसीटिव्हींच्या मदतीने आरोपींचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.