Rohini Hattangadi Birthday: अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) या भारतीय चित्रपटसृष्टीतील ट्रेंड सेटर अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे.अग्निपथ या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आईची भूमिका साकारत विशेष लोकप्रियता मिळवली. तसेच गांधी चित्रपटात (Gandhi) त्यांनी कस्तूरबा गांधी यांची भूमिका प्रभावीपणे साकारली होती. आज त्या त्यांचा 71 वाढदिवस साजरा करत आहेत. 

Continues below advertisement

27 व्या वर्षी 74 वर्षांच्या कस्तूरबा साकारल्या

रोहिणी यांचा जन्म 11 एप्रिल 1951 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. योगायोग म्हणजे कस्तूरबा गांधी यांचाही जन्म 11 एप्रिल 1869 रोजीच झाला होता. ‘गांधी’ चित्रपटात त्यांनी केवळ 27 व्या वर्षी 74 वर्षांच्या कस्तूरबा गांधी यांची भूमिका अत्यंत उत्तमरीत्या साकारली. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी नाट्यसृष्टीतून केली. चित्रपटसृष्टीत त्यांनी अरविंद देसाई की 'अजीब दास्तान' या चित्रपटातून पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना एक राष्ट्रीय पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अर्थ आणि ‘अग्निपथ’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

पुरुषाची भूमिकाही साकारली 

सामान्यतः चित्रपटांमध्ये पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका साकारल्याची उदाहरणे पाहायला मिळतात, मात्र एखाद्या अभिनेत्रीने पुरुषाची भूमिका साकारल्याचे क्वचितच दिसते. रोहिणी यांनी हा अपवाद मोडला. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट वन्स मोर मध्ये त्यांनी दमदार पुरुषाची भूमिका साकारून सर्वांना आश्चर्यचकित केले. या चित्रपटातील त्यांचा लूक खूपच व्हायरल झाला होता आणि त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Continues below advertisement

अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका गाजली 

रोहिणी हट्टंगडी यांना 1984 च्या पार्टी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘गांधी’ चित्रपटातील कस्तूरबा गांधी यांच्या भूमिकेसाठी त्यांना BAFTA पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून हा सन्मान मिळवणाऱ्या त्या भारतातील एकमेव अभिनेत्री आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रामुख्याने सहाय्यक भूमिका साकारल्या. ‘अग्निपथ’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका, सारांशमध्ये अनुपम खेर यांच्या पत्नीची भूमिका तसेच चालबाज मध्येही त्यांनी एक वेगळी आणि लक्षवेधी भूमिका साकारली. अग्निपथच्या भूमिकेनंतर त्यांनी एका मुलाखतीत यासंदर्भातील आठवण सांगितलेली. त्या म्हणलेल्या, यशजींना आईच्या भूमिकेसाठी मीच हवी होते. पण त्या काळात माझ्या सासूचे निधन झाले. पण तरीही ते माझ्यासाठी थांबले. मी त्यांच्याकडे दोन दिवसांची मुदत मागितली आणि त्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात केली. इतके मोठे कलाकार असतानाही यशजी माझ्यासाठी थांबले होते. असं त्या म्हणाल्या होत्या.