रितेशच्या हाती समशेर अन् चेहऱ्यावर शिवरुप तेज; 'राजा शिवाजी'चं पोस्टर रिलीज, चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर
Riteish Deshmukhs Powerful First Look Revealed: शिवजयंतीनिमित्त राजा शिवाजी चित्रपटाचे पोस्टर रिलीज. रितेश देशमुख साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका.

Riteish Deshmukh as Chhatrapati Shivaji Maharaj first look: शिवजयंतीचे औचित्य साधत अभिनेता रितेश देशमुखने आपल्या चाहत्यांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. अभिनेत्यानं नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह सुरु आहे. शिवभक्तांकडून अगदी आनंदात हा दिवस सणासारखा साजरा करण्यात येत आहे. अशातच अभिनेत्यानं नव्या कोऱ्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. 'राजा शिवाजी' असे चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरवरील रितेश देशमुखचा लूक अगदी लक्षवेधी आहे. रितेशला या शैलीत पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता रितेश देशमुख पुन्हा एकदा नव्या चित्रपटाद्वारे मोठी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. 'राजा शिवाजी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत रितेश देशमुख झळकणार आहे. तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा स्वत: रितेशने सांभाळली आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा आणि पराक्रम मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.
View this post on Instagram
रितेश देशमुखनं या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. अभिनेत्यानं पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आज तोच दिवस आहे, जेव्हा पहिल्यांदा अंधाराला एका प्रकाशाचं स्वप्न पडलं. इतिहासानं जेव्हा भविष्याकडे पाऊल उचलले. याच दिवशी आपल्या मातीला नवा स्वाभिमान मिळाला. शिवजयंतीच्या शुभ प्रसंगी जीओ स्टुडिओज, मुंबई फिल्म कंपनी सादर करीत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत 'राजा शिवाजी' या भव्य सिनेमाचं पहिलं पोस्टर. आपला राजा, आपला अभिमान', असं कॅप्शन लिहून अभिनेत्यानं पोस्ट शेअर केली. या चित्रपटात रितेश देशमुख व्यतिरिक्त अभिषेक बच्चन, संजय दत्त, जेनेलिया देशमुख यांच्यासह इतर दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दमदार कलाकारांमुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांसाठी अद्भूत अनुभव देणारा ठरेल.
'राजा शिवाजी' या चित्रपटाचे निर्माते ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख असून, अजय - अतुल या सुप्रसिद्ध जोडीनं या भव्य चित्रपटाला संगीत देण्याची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे हा चित्रपट भव्य दिव्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आठवण करुन देणारा ठरेल, एवढं मात्र नक्की. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट केवळ मराठी या भाषेत नसून, इतर भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच एक पॅन इंडिया प्रकल्प साकारले जात असल्यामुळे, अनेकांनी अभिमान व्यक्त केला आहे. बहुप्रतीक्षित हा चित्रपट महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

























