Riteish Deshmukh On Politics: महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच, अभिनेता रितेश देशमुखला (Actor Riteish Deshmukh) आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. तसं पाहिलं तर रितेश देशमुखचं (Riteish Deshmukh) राजकारणाशी (Politics) अगदी जवळचं नातं. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा तो मुलगा. रितेशनं राजकारण लहानपणापासूनच पाहिलंय, अनुभवलंय. आजही राजकारणातील दिग्गजांमध्ये विलासराव देशमुखांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. विलासरावांची दोन मुलं आणि रितेश देशमुखचे दोन भाऊ आजही राजकारणात सक्रिय आहेत. रितेशनं मात्र राजकारणाऐवजी अभिनय जगतात आपलं नाव कमावलंय. पण, असं असलं तरीसुद्धा रितेश अनेक राजकीय मुद्द्यावर रोखठोक भूमिका मांडताना दिसतो. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना रितेशनं राजकारणावर भाष्य केलंय. अभिनेता रितेश देशमुखनं राहुल महाजनच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. आता त्यानं राजकारणात येणार की नाही? यावर थेटच सांगून टाकलं आहे.
राजकारणातील एन्ट्रीबाबत रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला?
महाराष्ट्राचा लाडका भाऊ, अभिनेता रितेश देशमुख राजकारणातील एन्ट्रीबाबत म्हणाला की, "लोकांचं माझ्यावर अभिनेता म्हणून प्रेम आहे. तेच प्रेम मला इतर कोणत्या क्षेत्रात मिळेल हे गरजेचं नाही. आजपर्यंत अनेक अभिनेते नंतर राजकारणात गेले आणि त्यांनी चांगलं कामही केलं. काही असेही आहेत जे निवडणुकीत उभे राहिले पण जिंकू शकले नाहीत. मला वाटतं राजकारणासाठी वेगळ्या प्रकारची कमिटमेंट लागते. सध्या मी जे करतोय त्यात मी खूश आहे. जे केल्याने तुम्हाला आनंद मिळतो तेच आपण केलं पाहिजे असं मी नेहमीच सांगतो."
"आपण दोघांनी लहानपणापासून राजकारण खूप जवळून बघितलं आहे. अजूनही बघत आहोत. कधी शिकायची गरज नव्हती कारण घरातच राजकीय वातावरण असल्याने आपोआपच आपण ते शिकत गेलो. मी राजकारणात चांगलं काहीतरी करु शकतो असा विचार तू माझ्याबद्दल करतोय त्यासाठी आभार. पण मी असा विचार करत नाही. कारण प्रॅक्टिकली या गोष्टी करणं खूप वेगळं आहे.", असं रितेश म्हणाला.
पुढे बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, "तू जर मला विचारलंस की मला राजकारण आवडतं की नाही? तर हो, मला राजकारण खूप आवडतं. मला राजकारण समजतं. आज राजकारणात काय काय गोष्टी गरजेच्या आहेत हेही मला माहित आहे. पण राजकारण सजमणं आणि प्रत्यक्षात उतरून काम करणं यात खूप मोठं अंतर आहे. मी आज माझ्या भावांना बघतोय, ते काय करतायत. घरी जेवताना अनेक विषयांवर चर्चा होते."
"प्रत्येक जण आपापल्या परीने अनेक गोष्टी करतोय. वातावरण बदलतं, कधी तुम्ही सत्तेत असता तर कधी विरोधात असता हे सुरुच राहतं. पण तुम्हाला लोकांचं प्रेम मिळालंय म्हणून तुमच्यासाठी निवडणूक खूप सोपी होते असं गरजेचं नाही. कारण लोक खूप हुशार आहेत. एका अभिनेत्याकडून तुम्हाला असलेली अपेक्षा आणि एका नेत्याकडून असलेली अपेक्षा वेगळी. काहींना ते दोन्ही जमतं ही खरोखरंच वाखणण्याजोगी गोष्ट आहे. पण मला ते शक्य नाही...", असं रितेश देशमुख म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
