Ridhima Pandit In Marathi Movie Premachi Goshta 2: एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत 'प्रेमाची गोष्ट 2' (Premachi Goshta 2) हा दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या रोमॅन्टिक चित्रपटाची (Romantic Movie) सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमात रिद्धिमा पंडीत (Ridhima Pandit) आणि ललित प्रभाकरची (Lalit Prabhakar) जोडी झळकणार आहे. हिंदी मालिकांमधून ('बहु हमारी रजनीकांत', 'खतरों के खिलाड़ी') प्रचंड लोकप्रियता मिळवलेली रिद्धिमा तिच्या सोशल मीडियावरील उपस्थिती आणि रिलेटेबल कंटेंटमुळे जेन झी प्रेक्षकांमध्येही सुपरहिट ठरली आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट्स आणि रील्स नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात. त्यामुळे तिचं मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण केवळ मराठी चाहत्यांसाठीच नाहीतर, तर हिंदी आणि तरुण प्रेक्षकांसाठीही एक खास सरप्राईज ठरणार आहे.
नुकतंच प्रदर्शित झालेलं 'ये ना पुन्हा' हे रिधिमा आणि ललित प्रभाकर यांच्यावर चित्रित झालेलं रोमॅन्टिक गाणं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतंय. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली असून, चित्रपटाबद्दलचं कुतूहल अधिकच वाढत चाललं आहे.
आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाविषयी रिद्धिमा म्हणाली की, "हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे आणि पहिल्यांदाच मी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसतेय. त्यामुळे उत्साह आणि थोडीशी धडधड अशा मिश्र भावना आहेत. सतीश राजवाडे सरांसोबत काम करणं माझ्यासाठी एक खास अनुभव ठरला. ललितसोबत काम करताना खूप मजा आली. तो अत्यंत उत्तम सहकलाकार आहे. एकूणच हा प्रवास माझ्यासाठी खूप स्पेशल आणि अविस्मरणीय ठरला असून प्रेक्षक माझ्या या नव्या प्रवासाला नक्कीच प्रेम देतील, अशी मला खात्री आहे..."
दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं असून, निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. 21 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या निमित्तानं प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.