Red Soil Stories Fame Pooja Gawas Lost Her Father: '...अन् नशिबानं'; आधी पती, नंतर सहा महिन्यातच वडिलांनाही नियतीनं हिरावलं, 'रेड सॉईल स्टोरीज'च्या पूजा गवसवर कोसळला दु:खाचा डोंगर
Red Soil Stories Fame Pooja Gawas Lost Her Father: आयुष्यभराचा जोडीदार नियतीनं हिरावल्यानंतर आता पूजाच्या डोक्यावरचं पितृछत्रही हरपलं आहे. पूजानं सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

Red Soil Stories Fame Pooja Gawas Lost Her Father: 'रेड सॉईल स्टोरीज' (Red Soil Stories) या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शिरीष (Shirish Gawas) आणि पूजा गवस (Pooja Gavas) या जोडप्यानं कोकणातील पारंपरिक पदार्थ, ग्रामीण संस्कृतीचं दर्शन संपूर्ण जगाला घडवलं. पण, 2025 ऑगस्ट महिन्यात शिरीषचं आकस्मिक निधन झालं आणि अख्खा महाराष्ट्र हादरला. शिरीषच्या पश्च्यात त्याची पत्नी पूजा गवस आणि चिमुकली श्रीजा आहेत. पण, शिरीषच्या दुःखाची सल कायम असतानाच आता पूजा गवसवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्यभराचा जोडीदार नियतीनं हिरावल्यानंतर आता पूजाच्या डोक्यावरचं पितृछत्रही हरपलं आहे. पूजानं सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
पूजा गवसनं सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?
'रेड सॉईल स्टोरीज'च्या पूजा गवसनं पोस्टमध्ये म्हटलंय की, "प्रिय पपा, अखेर तुम्ही सुद्धा सोडून गेलात. आधी श्रीजाने तिचा बाबा गमावला आणि आता तिचे आजोबा. आता कुठे एका वादळातून किनारा गाठण्याचा प्रयत्न सुरू होता आणि नशिबाने दुसरे चक्रीवादळ पुढ्यात आणून ठेवले..."
"11 वर्ष तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंज दिलीत. ती सुद्धा न डगमगता न हार मानता. खर सांगू जेव्हा शिरीषच्या आजाराबद्दल पहिल्यांदा कळला तेव्हा सर्वात आधी तुम्हीच माझ्या डोळ्यासमोर आला होतात. वाटलेला तुम्ही इतके वर्ष आजाराशी दोन हात करताय मग शिरीषला सुद्धा काहीच होणार नाही. पण आज सगळेच विचार, सगळे निश्चय हरले. या आजाराच्या कितीतरी जीवघेण्या यातना तुम्ही कसलीच तक्रार न करता सहन केल्या. तुमची आलेल्या परिस्थितीशी लढण्याची ताकद माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील...", पूजा गवसनं म्हटलंय.
View this post on Instagram
"माझं विचारांनी दाटलेला मन मोकळं करण्यासाठी रोज संध्याकाळी मी आणि श्रीजा तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचो. पण आता तो मार्ग सुद्धा देवाने कायमचा बंद केला. या सगळ्यासाठी देवा तुझे किती आभार मानू..अजून काय काय लिहून ठेवलयस माझ्या साठी ते एकदाच सांगुनच टाक. तू दुःख देत राह पण ते पेलण्याची ताकद सुध्दा तूच दे. तुमच्या आजारपणात ज्या खंबीरपणे तुम्हाला मम्मीने साथं दिलीये तोच खंबीरपणा घेऊन मी जगायचं ठरवलंय.. काही झालं तरी हार मानायची नाही हे शिकवण तुम्ही दोघांनी दिलीये. जोपर्यंत श्वास घेतोय तोपर्यंत लढत रहायचं. पपा.. जिथे कुठे असाल सुखात राह. कायम पाठीशी राहा. शिरीषशी भेट झाली तर त्याला सांगा आम्ही आमची काळजी घेतोय..तू निश्चिंत रहा..
आम्हाला आशीर्वाद देत राह. तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...", असं पूजा गवस म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























