मुंबई : सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवणाऱ्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित 39 वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी होत आहे. 11 व 12 डिसेंबर 2025 रोजी, यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे रंगणाऱ्या या महोत्सवात एकापेक्षा एक कल्पनाशक्तीने ओतप्रोत 19 बालनाट्यांची रंगतदार चुरस पहायला मिळणार आहे.
यावर्षीची ही स्पर्धा रविकिरण मंडळाचे ज्येष्ठ, निष्ठावान सभासद मनोहर नगरकर आणि कोकणच्या लालमातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आली आहे. रविकिरण संस्थेचे अध्यक्ष नागेश नामदेव वांद्रे, चिटणीस विनीत रमेश देसाई, आणि कला विभाग प्रमुख मंदार अनिल साटम यांनी सांगितले की, “या 19 निवडक बालनाट्यांमध्ये मुलांनी दाखवलेली विलक्षण कल्पनाशक्ती आणि रंगभूमीवरील प्रभुत्व पाहून यंदाची स्पर्धा प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.”
1984 साली रविकिरण संस्थेने प्रथमच आयोजित केलेल्या बालनाट्य स्पर्धेने लालबाग–परळच्या कलापंढरीत एक नवे सांस्कृतिक व्यासपिठ निर्माण केले. सामाजिक जाणिवेतून सुरु झालेल्या या उपक्रमाने अनेक नवोदित बालकलावंतांना पहिली संधी, पहिलं व्यासपीठ आणि मोठी स्वप्नं रंगमंचावर मांडण्याची ताकद दिली.
विविध सामाजिक उपक्रमांमध्ये संघटनेचे कौशल्य सिद्ध करणाऱ्या रविकिरणने शिस्तबद्ध, पारदर्शक व निर्दोष निर्णय प्रक्रियेमुळे ही स्पर्धा तब्बल 38 वर्षे महाराष्ट्राच्या बालरंगभूमीच्या केंद्रस्थानी टिकवून ठेवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिकसह राज्यभरातील अनेक नामांकित शाळा दरवर्षी उत्साहाने सहभागी होतात हेच या स्पर्धेच्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहे.
रविकिरणने केवळ मंच उपलब्ध करून दिला नाही, तर बालनाट्याच्या गुणवत्तेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगही राबवले. सुप्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी आणि लेखक - अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 25 वर्षांपूर्वी सुरू केलेली बालकलावंत - शिक्षकांसाठी लेखन कार्यशाळा ही त्यातील सर्वांत महत्त्वाची देणगी. लेखन, कल्पनाशक्ती आणि नाट्यनिर्मितीची बीजे पेरणाऱ्या या कार्यशाळेने अनेक सक्षम लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार घडवण्याचे कार्य आजही अविरत सुरू ठेवले आहे.
यावर्षीही ही परंपरा अधिक समर्थपणे जपली गेली. सुप्रसिद्ध लेखक - अभिनेता अभिजित गुरु, लेखिका–अभिनेत्री शर्वरी पाटणकर, तसेच "दशावतार" या सुपरहिट मराठी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी मुलं आणि शिक्षकांना लेखनकौशल्यातील बारकावे आत्मीयतेने शिकवले - ज्यामुळे यंदाच्या स्पर्धेत अधिक प्रभावी, अर्थपूर्ण आणि दर्जेदार बालनाट्यांची निर्मिती घडून आली आहे.
Ravikiran balnatya spardha Schedule : रविकिरण बालनाट्य स्पर्धा 2025
गुरुवार 11 डिसेंबर 2025
सकाळी 9 वा. दिव्या खाली दौलत (दिंडीझ प्रतिष्ठान),
सकाळी 10 वा. एक प्रवास असाही (स्वानंद क्रिएशन्स),
सकाळी 11 वा. रंग जाणिवांचे (मुक्तछंद नाट्यसंस्था),
दुपारी 12 वा. ज्ञानाचा प्रकाश (लेक्सीकॉन ग्लोबल स्कूल),
दुपारी 1 वा. आम्ही नाटक करीत आहोत (महाराष्ट्रराज्य जवाहर बालभवन),
दुपारी 2 वा. कश्र्वीचा कृष्ण (ओंकार इंटरनॅशनल स्कूल, ठाकुर्ली),
दुपारी 3 वा. अवकाश (अभिरंग बालकला संस्था, कल्याण),
संध्या. 4 वा. रिअॅलिटीचा खेळ (डॉ कलमाडी शामराव स्कूल, पुणे ),
संध्या. 5 वा. आकांक्षांच्या पलीकडे (सेंट झेवियर्स इंग्लिश स्कुल, ठाणे),
संध्या. 6 वा. MY SUPER HERO (सखी प्रोडकशन्स),
संध्या. 7 वा. नात (सुलु नाट्य संस्था वाशी नवीमुंबई),
संध्या. ८ वा. रे क्षणा (पार्ले टिळक वि. इंग्रजी मा. विलेपार्ले),
रात्री 9 वा. होता जिवा म्हणून वाचला शिवा (संदेश विद्यालय- पार्क साईट)
शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी
सकाळी 9 वा. पैज (विलेपार्ले महिला संघ, मराठी माध्यम),
सकाळी 10 वा. अडलाय 'का' (सेक्रेड हार्ट स्कूल, वरप कल्याण),
सकाळी 11 वा. लिझल'स सिक्रेट (गुरुकुल द डे स्कूल),
दुपारी 12 वा. सदाबहार (बालगड रंगभूमी),
दुपारी 1 वा. टरगुटर्गू (रविंद्र शिक्षण प्रसारक मंडळ),
दुपारी 2 वा. सर्कस (अनुप मोरे स्पो. अँड सो. फाउंडेशन)
दुपारी 3 वा. निर्णय प्रक्रिया
संध्या. 4 वा. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण
‘रविकिरण’ची 39 वी स्मृती बालनाट्य स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून बालकलावंतांच्या स्वप्नांचा, कल्पनाशक्तीचा आणि कलात्मकतेचा भव्य उत्सव आहे. उद्याच्या रंगभूमीचे तारे घडवणारा हा महापर्व दरवर्षीप्रमाणे यंदाही नवे तेज, नवी उमेद आणि नव्या आशांनी उजळणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेतला मुकुटमणी ठरेल असा हा कलात्सव पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुढील काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.