Director Ravi Jadhav Wife Meghana Jadhav: मराठी सिनेसृष्टीचे (Marathi Film Industry) आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव (Director Ravi Jadhav) नेहमीच चर्चेत असतात. वेगळ्या धाटणीचे सुपरहिट सिनेमे (Superhit Movies) देऊन त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'न्यूड' असो वा 'ताली' वेब सीरिज रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी दिलीच. पण, त्यातून अनेक सामाजिक बाबींवर प्रकाश टाकलाय. रवी जाधव जेवढे इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहेत, तेवढीच त्यांची पत्नी मेघना जाधव (Meghana Jadhav) देखील इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे. नुकतीच मेघना यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी त्यांच्या आजवरच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे.
रवी जाधव आणि मेघना जाधव यांची हटके लव्ह स्टोरी आपल्या सर्वांना माहीत आहेच. या जोडप्याला दोन मुलं आहेत. अशातच त्यांच्या सुखी संसारात वादळ तेव्हा आलं, ज्यावेळी त्यांच्या मोठ्या मुलाला वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी ब्लड कॅन्सरचं निदान झालं. त्या वेळी मेघना यांनी मोठ्या हिमतीनं या संकटाचा सामना केल्याचं त्या सांगतात.
आयुष्यातल्या कठीण प्रसंगाबाबत बोलताना मेघना जाधव काय म्हणाल्या?
'सर्व काही क्लिप्स' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मेघना जाधव यांनी त्या कठीण प्रसंगाविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, "माझ्या मोठ्या मुलाला हेल्थ इश्यू होते. वयाच्या 13 व्या वर्षी त्याला ब्लॅड कॅन्सरचं निदान झालं. त्याचं वय वाढत होतं, तसं मी त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन करत होते. पण एक दिवस त्याला अचानक त्रास व्हायला लागला. आपण कधीच असा विचार करत नाही, त्यामुळे आम्हाला वाटलं 8-10 दिवसांत तो बरा होईल..."
"पण नंतर त्याची तब्येत खूप बिघडायला लागली, आम्हाला काही कळत नव्हतं. मग रिपोर्ट आले आणि आम्ही ठरवलं की, आपण आपल्या मुलाला ही गोष्ट सांगायची नाही. त्यादिवशी मी खूप रडले. त्यानंतर रात्रीचे दीड दोन वाजलेले मी उठले आणि सगळ्यांना म्हटलं, बस्स! संकट आलंय, त्याला सामोरं गेलं पाहिजे... तो माझी वाट बघत होता. मी मुलाजवळ गेले आणि त्यानं मला विचारलं, 'आई मला खरंच फार गंभीर असं काही झालंय का? म्हणजे, मी मरणार का?', मी म्हटलं नाही... सहा महिने आता तू सुट्टीवर, तुझ्या आयुष्यातले सहा महिने मला दे... मी जे सांगेन त्यावर विश्वास ठेव. तू यातून नक्कीच बाहेर पडशील... पूर्ण सहा महिने मला त्यानं काहीच विचारलं नाही. कधीपण मी त्याच्या समोर गेलं की, तो माझ्याकडे बघायचा. म्हणजे, मी कशी दिसतेय यावरून त्याला कळायचं की, काही सिरिअस आहे की नाही... हॉस्पिटलमध्ये आपण कसंही जातो. त्याच्यासाठी मी स्वतः व्यवस्थित राहिले.", असं मेघना जाधव म्हणाल्या.
पुढे बोलताना मेघना जाधव म्हणाल्या की, "मग आम्ही सगळ्यांना सांगितलं. ज्या लोकांना त्याला बघून दया येईल, दु:ख वाटेल. अशा लोकांनी स्ट्रिक्टली येऊ नका... कारण, मला त्याच्या डोळ्यात अश्रू पाहायचे नव्हते... पण सहा महिन्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली... आणि मी त्याला दिलेलं वचन पाळू शकले नाही. मला त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट करावं लागलं, त्यासाठी मला त्याला घेऊन बंगळूरूला जायचं होतं... तिथे आम्ही दोघंच गेलो... त्याला चांगलं वाटावं म्हणून मी तयार व्हायचे. आम्ही सिनेमा बघायचो, डान्स करायचो या सगळ्यात खूप सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं आणि आता माझा मुलगा त्यातून बाहेर आला आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :