Rashmika mandanna Vijay Devarakonda wedding: ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना आणि लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा यांचा बहुचर्चित विवाह अखेर पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. राजस्थानमधील ITC Mementos Udaipur येथे हा शाही सोहळा पार पडल्याची माहिती आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, दोघांनी पारंपरिक तेलुगू रितीरिवाजांनुसार सकाळी 10.10 वाजता विवाहबंधनात अडकले. वरमाला समारंभादरम्यान दोघेही भावुक झाले होते. लग्नाआधी 24 फेब्रुवारी रोजी संगीत आणि हळद अशा प्री-वेडिंग समारंभांचे आयोजन करण्यात आले होते.
या विवाह सोहळ्याला अत्यंत मर्यादित पाहुण्यांची उपस्थिती होती. जवळचे मित्र, कुटुंबीय आणि काही निवडक मान्यवर यांच्याच उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि थरून भास्कर यांनीही उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.
लग्नानंतर वधू-वरांच्या मित्रमंडळींनी बाहेर जमलेल्या माध्यम प्रतिनिधी आणि चाहत्यांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. सेलिब्रिटी फोटोग्राफर Viral Bhayani ने यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काल रश्मिका आणि विजय या दोघांची संगीत नाईट झाली. यावेळी दोघेही मंचावर नाचताना दिसले. त्यांच्या नाचाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती, हैदराबादमध्ये होणार रिसेप्शन
उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत रश्मिका-विजय यांचीही भर पडली आहे. यापूर्वी कटरीना कैफ विकी कौशल तसेच कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही राजस्थानमध्ये लग्न केले होते. काही वर्षे आपले नाते खासगी ठेवलेल्या या जोडीने लग्नापूर्वी ‘विरोश’ हा हॅशटॅग शेअर करत चाहत्यांना संकेत दिला होता. उदयपूरमधील समारंभानंतर ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, संगीत सोहळ्यात रश्मिकाने ‘Pushpa 2: The Rule’मधील ‘अंगारो’ गाण्यावर केलेल्या डान्सने विशेष लक्ष वेधले. विजयच्या आईने रश्मिकाला पारंपरिक बांगड्यांची भेट दिल्याचीही चर्चा आहे. आता या शाही लग्नाचे अधिकृत फोटो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
