'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
शूटिंगच्या पहिल्याच दिवशी विजयच्या थेट बोलण्यामुळे रश्मिकाच्या डोळ्यांत पाणी आलेलं. त्यावेळी रश्मिका इंडस्ट्रीत नवीन होती, तर विजयने यापूर्वी काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

Rashmika Mandanna Vijay Devarkonda First Meet: अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) ही जोडी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. दोघांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र या दोघांची पहिली भेट थोडी वेगळीच झालेली. 'गीता गोविंदम'च्या सेटवर पहिल्याच दिवशी विजयने रश्मिकावर ओरडल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. रश्मिका मंदानाने 'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडासोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी विजयच्या थेट बोलण्यामुळे रश्मिकाच्या डोळ्यांत पाणी आलेलं. त्यावेळी रश्मिका इंडस्ट्रीत नवीन होती, तर विजयने यापूर्वी काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
रश्मिका विजयला 'सर' म्हणायची
रश्मिका मंदाना त्यावेळी इंडस्ट्रीत नवीन होती. तर विजय देवरकोंडाने त्याआधी काही चित्रपट केले होते. त्यामुळे रश्मिका त्याला 'सर' म्हणून हाक मारायची. मात्र 'गीता गोविंदम'च्या सेटवर पहिल्याच दिवशी दोघांमध्ये एक विचित्र प्रसंग घडला.शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये रश्मिकाने हा किस्सा सांगितला. ती म्हणाली की, शूटिंगच्या पहिल्या दिवशी ती सेटवर म्युझिक ऐकत होती. त्यावेळी विजयने अचानक तिला ते म्युझिक बंद करण्यास सांगितलं. विजयची बोलण्याची पद्धत पाहून रश्मिकाला वाईट वाटलेलं आणि ती रडायला लागली होती.
'हे कसलं भंगार म्युझिक लावलंय?'
विजयनेही नंतर या प्रसंगाबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की, तो स्वभावाने स्पष्टवक्ता आहे. मनातलं थेट बोलण्याची त्याची सवय आहे. मात्र समोरची व्यक्ती आपली भावना समजून घेईल, असं गृहीत धरणं त्यावेळी चुकीचं होतं.विजयने सांगितलं की, त्याने रश्मिकाला थेट विचारलं होतं, 'हे कसले भंगार म्युझिक लावलंय?' कारवाँमध्ये दोघांना जागा शेअर करावी लागत असल्यामुळे त्याने मोठ्याने आवाज दिला होता. मात्र विजयच्या या बोलण्याचा रश्मिकावर मोठा परिणाम झाला. विजय आपल्याला पसंत करत नाही, असं रश्मिकाला वाटलं. तिच्या डोळ्यांतून पाणी आले होते, असं विजयनेही सांगितलं.
नंतर दोघांची मैत्री झाली
या प्रसंगानंतर मात्र दोघांचं नातं हळूहळू बदललं. 'गीता गोविंदम'च्या शूटिंगदरम्यान विजय रश्मिकाला संवाद म्हणताना मदत करायचा. त्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली.रश्मिकाने सांगितलं की, त्यावेळी ती खूप संवेदनशील होती आणि छोट्या-छोट्या गोष्टींचाही तिला त्रास व्हायचा. मात्र विजय तिच्या संवादांमध्ये मदत करू लागल्यानंतर दोघे चांगले मित्र झाले. त्यानंतर रश्मिकाने विजयला 'सर' म्हणणंही बंद केलं.'गीता गोविंदम'नंतर ही जोडी 'डियर कॉमरेड'मध्येही एकत्र दिसली. या दोघांच्या नात्याचीही अनेकदा चर्चा झाली आहे. आता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. राहुल सांकृत्यान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या 'रणबाली' या पीरियड अॅक्शन ड्रामामध्ये ही जोडी दिसणार असून, हा चित्रपट 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.





















