Rashami Desai Opens Up About Battling Depression: ग्लॅमरसच्या पडद्यामागे बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. कधी दु:ख तर कधी स्ट्रेस. झगमगत्या मुखवट्यामागे दु:ख लपवून जगणं तसं अवघडच. काही जण त्या परिस्थितीला सामोरे जातात. तर काही जण खचतात. त्या काळाचा प्रचंड त्रास होतो. सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी, मानसिक त्रास प्रत्येकाला होतो. असाच काहीसा त्रास हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाईला झाला होता. वैवाहिक जीवन असो किंवा आर्थिक अडचण. तीनं धीटानं सगळ्याच गोष्टींचा सामना केला. आयुष्यातील चढ उतार, आणि नैराश्याचा मानसिक आरोग्यावर कसा नकारात्मक परिणाम होतो? यावर तिनं भाष्य केलं आहे.
'उतरन' या मालिकेतून रश्मी देसाई घराघरात पोहोचली. ती 8 वर्षे नैराश्याचा सामना करीत होती. हा काळ तिच्यासाठी वेदनादायक ठरला. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "यातून बाहेर पडणं तसं अवघडच होतं. सोपं नव्हतं. मी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. भावनिक आणि व्यावसायिकदृष्ट्या पुन्हा स्वत:ला तयार केले", असं रश्मी म्हणाली.
"एक काळ असा होता, जेव्हा मी एकूण 8 वर्षे नैराश्यात होते. मी स्वत:च्या मनावर ओझे वाहून जगत होते. मला पुन्हा एकदा सुरूवात करताना प्रचंड त्रास झाला. कामातून मला शांती मिळते. कामातूनच आपली या सगळ्यातून सुटका होते. ही गोष्ट मला खूप उशीरा समजली. आता मी स्वत:ला कामातून व्यग्र ठेवलं आहे. माझं संपूर्ण लक्ष कामाकडे आहे", असं अभिनेत्री म्हणाली.
रश्मी देसाईचे नंदिश पंजाबीसोबत विवाह झाला होता. दोघांचे लग्न 2012मध्ये झाले होते. परंतु, लग्नाच्या एक वर्षांनंतर दोघांमध्ये खटके उडाले. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले. नंतर रश्मी आणि नंदीशने नात्याला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, तिचा गर्भपात देखील झाला असल्याची माहिती दिली. नच बलिये या कार्यक्रमानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा दुरावा आला. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
अभिनेत्रीचा घटस्फोट का झाला?
रश्मीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या मित्रांनी सांगितले की, रश्मीचा नंदिशबाबतीत खूप पझेसिव्ह होती. यामुळे दोघांमध्ये सतत भांडणं होत. भांडणामुळे दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत रश्मीनं सांगितलं की, "नंदिशनं या नात्यात जर 100 टक्के दिले असते तर, कदाचित आज परिस्थिती बदलली असती. मला त्याच्या फ्रेंड्स किंवा मैत्रिणींपासून काहीच त्रास नव्हता. मी त्याच्यावर कधीही संशय घेतला नाही", असं तिनं स्पष्ट केलं.