FIR filed against Badshah over Haryanvi song: रॅपर बादशाहच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी. गायकाच्या अडचणीत वाढ होणार आहे. 'टटीरी' या हरियाणवी गाण्याबाबत त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. हरियाणा राज्य महिला आयोगाने या संदर्भात पोलिसांकडे धाव घेतली आहे. तसेच पोलिसांना निर्देश दिले आहेत की, जर बादशाहने तपासात सहकार्य केले नाही तर, त्याच्यावर अटकेची कारवाई करावी. तसेच आवश्यक असल्यास बादशाहचा पासपोर्ट जप्त करावा. अन्यथा तो या प्रकरणातून परदेशात जाऊन पळ काढू शकतो. हरियाणा राज्य महिला आयोगाने बादशाह यांना या प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले होते.
खरंतर, या प्रकरणात बादशाहला चौकशीसाठी 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पानिपत येथील आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान, सांगितलेल्या वेळेपर्यंत न पोहोचल्याने आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी बादशाहवर पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 'पानीपत आणि पंचकुला पोलिसांनी बादशाहवर तात्काळ कारवाई करावी आणि गरज पडल्यास त्याला अटक करावी', अशी मागणी केली आहे.
यासह संपूर्ण राज्याला सूचना जारी केले की, जोपर्यंत बादशाह आयोगासमोर हजर होत नाही, तोपर्यंत बादशाहच्या कोणत्याही संगीत कार्यक्रमांना हरियाणात परवानगी दिली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं. आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं की, 'पोलीस तपासादरम्यान बादशाह परदेशात जाऊन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करु शकतो. अशावेळी पोलीस त्याचा पासपोर्ट देखील जप्त करु शकतात. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी', असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
बादशाहच्या वकिलांनी माध्यमांसमोर सांगितलं की, महिला आयोगानं बादशाहला वेळ दिला आहे. दरम्यान, बादशाहने आधीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये त्याने जनतेची आधीच माफी मागितली होती. तसेच कुणाच्याही भावना दुखावण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता असे म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद तेव्हा सुरु झाला, जेव्हा हरियाणा पोलिसांनी बादशाहविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.
पोलिसांच्या म्हणणयानुसार, गाण्याच्या व्हिडिओमध्ये शाळेच्या गणवेशातील मुली हरियाणातील रोडवेजमधील बसमध्ये नाचताना आणि आक्षेपार्ह वाटणारे हावभाव आणि शब्द वापरताना दाखवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बादशाहविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
