Dhurandhar Ranveer Singh: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती फक्त धुरंधरची. 25 दिवसात सुमारे 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. या चित्रपटातील सर्वच कलाकारांची चर्चा झाली. रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अक्षय खन्ना वेगळाच भाव खाऊन गेला. चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशाचं सगळीकडं कौतुक होत असताना रणवीर सिंह मात्र अनेक दिवस शांत दिसला. धुरंधरच्या कुठल्याही चर्चेत तो दिसला नाही. त्याच्या मुलाखती सोडाच पण तो आनंद व्यक्त करतानाही दिसला नाही. पण आता धुरंधरच्या यशानंतर अभिनेता रणवीर सिंहने प्रतिक्रिया दिली आहे.
'गली बॉय' चित्रपटानंतर रणवीर सिंहच्या अनेक चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट फारशी कमाई करतानाही दिसले नाही. '83' चित्रपटाला समीक्षकांची दाद मिळाली पण कोविडमुळे चित्रपट आर्थिकदृष्ट्या असफल ठरल्याचं दिसलं. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला त्यातल्या त्यात चांगला प्रतिसाद मिळाला. धुरंधरने जवळपास सगळेच रेकॉर्ड मोडले. पण तरीही रणवीर सिंह फारसा व्यक्त होताना दिसला नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर एकदाच फक्त त्याने स्टोरी टाकली होती. त्यात तो म्हणाला होता की, " नशिबाची एक सुंदर सवय असते. वेळ आली की ते बदलतंच. पण तोपर्यंत संयम आणि आशा ठेवा."
पाजी, खूप मेहनत केलीय...
एंटरटेनमेंट विश्वात सध्या रणवीर सिंहच्या मेहनतीची जोरदार चर्चा रंगली आहे. पॅपराझी वरिंदर चावला यांनी Hindi Rush च्या राऊंडटेबल मुलाखतीत रणवीरच्या भूमिकेसाठी केलेल्या मेहनतीचा एक वेगळाच पैलू उलगडला आहे. वरिंदर यांच्या म्हणण्यानुसार, प्रमोशनदरम्यान रणवीरशी जेव्हा जेव्हा भेट झाली, तेव्हा अभिनेता वारंवार एकच गोष्ट सांगायचा, “पाजी, या चित्रपटासाठी मी प्रचंड मेहनत केली आहे.”
भूमिकेसाठी 15 किलो वजन आधी वाढवलं मग घटवलं
या भूमिकेसाठी रणवीर सिंहने तब्बल 15 किलो वजन वाढवलं होतं, हे ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे शूटिंग संपल्यानंतर त्याने तेवढंच वजन पुन्हा कमीही केलं. वरिंदर चावला सांगतात की, चित्रपट पाहिल्यानंतर हे स्पष्टपणे जाणवतं की ही केवळ रणवीरचीच मेहनत नाही, तर संपूर्ण टीमच्या कष्टांचा हा परिणाम आहे. प्रत्येक फ्रेममध्ये कलाकार आणि तंत्रज्ञांची मेहनत दिसून येते.
दरम्यान, चित्रपट रिलीजपूर्वी एक वादही समोर आला होता. IFFI दरम्यान रणवीर सिंहने कांतारा स्टार ऋषभ शेट्टीचं कौतुक करत दैव (Daiva) शी संबंधित एक सीन सादर केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी यावर धार्मिक भावनांशी संबंधित टीका केली. मात्र या प्रकरणावर बोलताना वरिंदर चावला यांनी रणवीरची बाजू घेतली आहे. रणवीरचा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता, तो फक्त कलाकार आणि चित्रपटाबद्दल आदर व्यक्त करत होता, असं त्यांनी स्पष्ट केलं.
धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 26 दिवसांत या चित्रपटाने जगभरात 1100 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत भारतीय सिनेमाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. यशाच्या या शिखरानंतर आता चाहत्यांची नजर धुरंधर 2 कडे लागली आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
