Ranveer Singh Viral Video: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह ( Ranveer Singh) कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रणवीर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. दरम्यान, शूटिंगच्या निमित्ताने एका कॅफेमधील रणवीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. चाहत्यांनाही तो चांगलाच आवडला आहे. एका कॅफेमधील जाहिरात शूटदरम्यान घडलेला हा हलकाफुलका संवाद अभिनेत्री दीक्षा नारंगने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
कॅफेमध्ये नेमकं घडलं काय?
व्हिडीओमध्ये दिसतं की, जाहिरातीच्या शूटदरम्यान कॉफी तयार करताना मशीनमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे काही वेळ शूट थांबवावं लागलं. या वेळेत अभिनेत्री दीक्षा नारंगने रणवीरशी सहज गप्पा मारायला सुरुवात केली. कॉफी बनवण्याची प्रक्रिया पाहताना ती म्हणाली, "ही कॉफी बनवण्याची पद्धत अगदी केमिस्ट्री लॅबसारखी वाटतेय... कॉफीसाठीची केमिस्ट्रीच जणू."मात्र, 'केमिस्ट्री' हा शब्द ऐकताच रणवीरने त्याचा वेगळाच अर्थ घेतला. तो लगेच हसत म्हणाला, "अरे... तू किती फ्लर्ट करते आहेस? कॉलेजचे दिवस आठवले. पण आता लवकरच मी दोन मुलांचा बाप होणार आहे."
रणवीरचं हे उत्तर ऐकताच सेटवर एकच हशा पिकला. त्याच्या या उत्स्फूर्त आणि मिश्कील प्रतिक्रियेनं वातावरण आणखी हलकं झालं. हा व्हिडीओ शेअर करताना दीक्षा नारंगने रणवीरचं कौतुकही केलं आहे. शूटच्या दिवशी त्याच्याशी अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली. त्याचा साधेपणा, प्रत्येकाशी मनमोकळेपणाने बोलण्याची पद्धत आणि विनोदबुद्धी तिला विशेष भावल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून रणवीरच्या या भन्नाट उत्तरावर चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
