मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. चेक बाउंसच्या 7 प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या राजपाल यादव यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कडक शब्दांत फटकारले आहे.  'आम्हाला अशा वृत्तीवर कसा उपचार करायचा हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. तुम्ही इथेही अभिनय करत आहात, पण हे चालणार नाही,' अशा  शब्दांत कोर्टाने त्यांना सुनावले आहे. तुझी खरी जागा तुरुंगातच आहे, अशी गंभीर टिप्पणी देखील न्यायमूर्तींनी केली आहे.

Continues below advertisement

सुप्रीम कोर्टाच्या या आक्रमक भूमिकेमुळे अभिनेता राजपाल यादव याला तुरुंगाची हवा खायला लागू शकते अशी शक्यता निर्माण झाली असून बॉलिवूड वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Supreme Court On Rajpal Yadav : नक्की काय घडले कोर्टात?

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात राजपाल यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. 10 जुलै 2026 रोजी दिल्ली हायकोर्टाने त्यांना 3 महिन्यांची जेल आणि 7 प्रकरणांमध्ये 1.35 कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

Continues below advertisement

यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने राजपाल यादव यांना अंतरिम दिलासा देताना 5 कोटी रुपये रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर 15 सप्टेंबरला त्यांनी मालमत्ता विकून पैसे जमा करणार असल्याचे सांगत 2 कोटींचा डिमांड ड्राफ्ट सादर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कोर्टाने त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.

Cheque Bounce Case Rajpal Yadav : फक्त 50 लाखच का? कोर्टाचा संतप्त सवाल

सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राजपाल यादव यांच्या वकिलांनी 50 लाख रुपयांच्या डिमांड ड्राफ्टची प्रत कोर्टात सादर केली. यावर खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला. "जेव्हा 5 कोटी रुपये जमा करण्याचे स्पष्ट आदेश होते, तेव्हा फक्त 50 लाख रुपयेच का?" असा सवाल कोर्टाने केला.

Supreme Court Strict Remarks : 'तुमची जागा जेलमध्येच'

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांनी अत्यंत कडक टिप्पणी करत म्हटले, "तुमची जागा जेलमध्येच आहे. तक्रारदाराला काही रक्कम मिळावी या उद्देशाने तुमच्या टाळाटाळ करणाऱ्या वृत्तीकडे आतापर्यंत दुर्लक्ष केले जात होते. पण आता तुमची याचिका फेटाळण्यावर विचार केला जाईल."

यावर राजपाल यादव यांच्या वकिलांनी 50 लाखांच्या देयकाचे समर्थन करत तक्रारदार गरीब नसल्याचा युक्तिवाद केला. यावर कोर्टाने रोखठोक उत्तर देत म्हटले, "तुम्ही जितकी रक्कम दाबून ठेवली आहे, तेवढे तरी ते निश्चितच गरीब आहेत. आम्हाला अशा अहंकारावर उपचार कसा करायचा हे चांगल्या प्रकारे माहीत आहे."

Ata Pata Laapata Movie Loan : काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण वर्ष 2010 मधील आहे. 'अता पता लापता' हा सिनेमा बनवण्यासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून राजपाल यादव, त्यांची पत्नी आणि त्यांच्या प्रॉडक्शन कंपनीने सुमारे 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

चित्रपट प्रदर्शित होण्यास उशीर झाल्यानंतर पैसे परत करण्याबाबत करार झाला, परंतु कंपनीला दिलेले 7 चेक बाउंस (Cheque Bounce) झाले. यानंतर कंपनीने कोर्टात धाव घेतली. एप्रिल 2018 मध्ये ट्रायल कोर्टाने आणि 2024 मध्ये सेशन्स कोर्टाने राजपाल यादव यांना दोषी ठरवले होते. आता सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी बुधवारी ठेवली असून राजपाल यादव यांना दिलासा मिळतो की त्यांची रवानगी थेट जेलमध्ये होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा: