मुंबई : कोरोना आला आणि लॉकडाऊनमुळं सर्वच क्षेत्रं प्रभावित झाली. मनोरंजनाच्या क्षेत्रालाही मोठा फटका यामुळं बसला. या काळात अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आले. अशात मराठी चित्रपट ‘राजकुमार’ गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. आता परिस्थितीत सुधार होताना दिसत असल्यामुळे निर्मात्यांनी हा सिनेमा युट्यूबर प्रदर्शित केला आहे.  SRF Talkies Youtube Channel वर राजकुमार प्रदर्शित केला (Rajkumar marathi film release on you tube) आहे. हा सिनेमा निर्मात्यांनी वेगळ्या स्वरूपात रिलीज केला आहे, तो म्हणजे तुम्ही आधी सिनेमा बघा, बघुन झाल्यावर पैसे द्या, असा एक आगळा वेगळा प्रयोग या केला आहे. 


राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ख्वाडामधील अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका आहे. त्याच्यासोबत बबन सिनेमातील गायत्री जाधव, प्रवीण तरडे, देविका दफ्तरदार, राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे आणि केजीएफ फेम अर्चना जॉईस अशा कलाकारांनी देखील भूमिका केल्या आहेत. 


'राजकुमार' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समर्थ राज इडिगा यांनी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, लॉकडाऊनमुळे थेटरला बंद आसल्या कारणाने निर्माते मोठ्या अडचणीत आले आहेत. राजकुमार हा मोठ्या बजेट आणि स्टारकास्टचा सिनेमा Youtube channel ला रिलीज करण्याचे धाडस आम्ही फक्त प्रेक्षकांच्या भरवशावर दाखवले आहे, असं ते म्हणाले. यूट्यूबवर रिलिज केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याचा दावा देखील इडिगा यांनी केला आहे. 


त्यांनी म्हटलं की, राजकुमार हा सिनेमा तुम्ही Youtube channel वर पैसे न देता पाहू शकता. पण सिनेमा बघून झाल्यावर तुम्हाला या सिनेमाचे पैसे तुमच्या इच्छेनुसार द्यायचे आहेत. प्रेक्षक आमच्या आव्हानाला प्रतिसाद देतील असं त्यांनी म्हटलं आहे.


 सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मराठीसह सर्वच भाषांतील सिनेमे थिएटरमध्ये रिलिज व्हायला लॉकडाऊनमुळं अडचणी असताना हा नवा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो हे पाहण्यासारखे असेल.