Raja Hindustani Fame pardesi pardesi actress pratibha sinha : जर तुम्ही 90 च्या दशकापासूनच चित्रपटांचे चाहते असाल आणि हिंदी चित्रपटांचा तो सुंदर काळ अनुभवला असेल, तर 'राजा हिंदुस्तानी'मधील सुपरहिट गाणं 'परदेसी परदेसी जाना नहीं' आजही तुमच्या आठवणीत ताजं असेल. या गाण्यात एक अशी अभिनेत्री दिसली होती, जिने लीड अ‍ॅक्ट्रेस करिश्मा कपूर असतानाही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आपल्या  सुंदर डोळ्यांनी आणि मनमोहक अदांनी  ती करिश्मा कपूरवरही भारी पडली होती. लोक फक्त गाण्याचेच नव्हे तर त्या अभिनेत्रीचेही चाहते झाले होते. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी प्रतिभा सिन्हा होती.

प्रतिभा सिन्हा जेव्हा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा सगळ्यांना वाटलं की ती आपल्या आईसारखं दीर्घ आणि यशस्वी करिअर करेन. तिने 1992 मध्ये सुजॉय मुखर्जीसोबत पदार्पण केलं होतं, पण खरी ओळख तिला 1996 मधील ब्लॉकबस्टर ‘राजा हिंदुस्तानी’मधील गाण्यामुळे मिळाली.

राजा हिंदूस्तानी सिनेमात काम केल्यानंतर सिनेसृष्टीतून गायब 

'परदेसी परदेसी' हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की प्रतिभा सिन्हाची एक झलकही तिला रातोरात चर्चेत घेऊन आली. यानंतर तिने ‘दिल है बेताब’, ‘पोकिरी राजा’, ‘दीवाना मस्ताना’, ‘कोई किसी से कम नहीं’, ‘जंजीर’ आणि ‘मिलिट्री राजा’ अशा अनेक चित्रपटांत काम केलं. तिच्या अभिनयात साधेपणा आणि आत्मविश्वास दिसून येत होता. मात्र ही चमक फार काळ टिकली नाही. 2000 च्या सुमारास तिने अचानक चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकला. ना कुठल्या मुलाखती, ना सामाजिक कार्यक्रमांतील उपस्थिती दर्शवली  आणि प्रतिभा एकदम गायब झाली. मात्र अलीकडेच ती मुंबईत एका प्रदर्शनात दिसली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

29 वर्षांनंतर लोकांनी ओळखलंच नाही

जवळपास 29वर्षांनंतर जेव्हा ती पुन्हा लोकांसमोर आली, तेव्हा अनेकांना तिची ओळख पटलीच नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आणि ती पुन्हा चर्चेत आली. या प्रदर्शनात तिने 8-10 साड्या खरेदी केल्या आणि उपस्थित लोकांशी अगदी सहज बोलत होती. यावेळी तिने स्वतः सांगितलं की आता तिचं नाव प्रतिभा लोहानी आहे.

चित्रपटसृष्टीत येण्याआधी तिचं हेच नाव होतं. ‘लोहानी’ हे तिचे वडील चिदंबर प्रसाद लोहानी यांचं आडनाव आहे, जे नेपाळचे प्रसिद्ध अभिनेते होते. समोर आलेल्या फोटोमध्ये तिचे केस पांढरे झालेले दिसत होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. तिने काळ्या रंगाचा साधा ड्रेस घातला होता आणि चेहऱ्यावर हसू होतं. लोक म्हणू लागले, “ही तर ओळखूच येत नाहीये!”

प्रतिभा सिन्हाचे खासगी आयुष्यही खूप गाजलं. तिचं नाव प्रसिद्ध संगीतकार नदीम सैफी यांच्याशी जोडलं गेलं. दोघांची ओळख चित्रपटांदरम्यान झाली आणि नातं हळूहळू जवळचं झालं. मात्र हे नातं प्रतिभाची आई माला सिन्हा यांना कधीच मान्य नव्हतं. नदीम आधीपासूनच विवाहित होते आणि वेगळ्या धर्माचेही होते. ही गोष्ट माला सिन्हांना अजिबात पटली नाही.

यानंतर प्रतिभाने माध्यमांसमोर येऊन स्पष्ट सांगितलं की, ना ती कधी नदीमशी लग्न करत होती, ना तिला त्याच्याशी प्रेम होतं. तिच्या या वक्तव्यानंतर नदीम पूर्णपणे कोसळले. एका मुलाखतीत त्यांनी दावा केला की माला सिन्हांनी त्यांच्या कुटुंबावर मानसिक छळ केला, फोन करून शिव्याशाप दिले आणि त्यांच्या आयुष्याला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

आता प्रतिभा सिन्हा कुठे आहे? आता जेव्हा प्रतिभा सिन्हा पुन्हा लोकांसमोर आली आहे, तेव्हा तिच्या चाहत्यांना हे जाणून आनंद होत आहे की ती एक समाधानी आणि शांत जीवन जगत आहे. तिने आता चित्रपटांपासून दूर राहणंच पसंत केलं आहे आणि प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर एक खासगी आयुष्य जगते आहे. तिभा सिन्हाची कहाणी म्हणजे एका अशा कलाकाराची कहाणी आहे, जिच्या वाट्याला यश, वाद आणि नंतर त्या साऱ्या दुनियेपासून दूर जाणं आलं. आज ती मुंबईतच राहते, मात्र ग्लॅमरच्या झगमगाटापासून खूप लांब असते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Actor Who Played 45 Roles In One Movie: ना कमल हसन, ना रजनीकांत, एकाच फिल्ममध्ये 'या' अ‍ॅक्टरनं साकारल्यात 45 भूमिका, रचला वर्ल्ड रेकॉर्ड